

नवी दिल्ली: दक्षिण दिल्लीतील मालवीयनगर भागात बुधवारी पहाटे एका पाच मजली हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत किमान २१ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये १७ परदेशी नागरिकांचा समावेश असून, ते बांगलादेश आणि विविध आफ्रिकन देशांतील रहिवासी होते. आग लागल्याचे कळताच अनेकांनी वरच्या मजल्यांवरून उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला व त्यात ते गंभीर जखमी झाले.
या धक्कादायक घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी हॉटेल मालकाविरुद्ध 'सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेनंतर हॉटेल मालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.दरम्यान, ‘हॉटेलला लागलेल्या आगीनंतर सुरू असलेले बचावकार्य आता संपले आहे. आग पूर्णपणे विझविण्यात आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे’, असे दिल्ली अग्निशमन विभागाचे उपमहानिरीक्षक रवींद्र सिंह यांनी सांगितले.
मालवीयनगरमधील हौझ राणी या गजबजलेल्या भागातील 'फ्लरिश स्टे बी अँड बी' या हॉटेलमध्ये ही दुर्घटना घडली. हॉटेलच्या तळमजल्यावर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये पहाटे शेफ आला आणि त्याने गॅस किंवा यंत्रणा सुरू केली. त्यानंतर काही वेळातच तिथे एका मोठ्या स्फोटासारखा आवाज झाला. अवघ्या काही मिनिटांत आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण इमारतीला वेढले, ज्यामुळे वरच्या मजल्यांवर झोपलेले पर्यटक आतमध्येच अडकले.
आग लागल्यानंतर इमारतीत अडकलेले लोक सतत मदतीसाठी याचना करत होते. स्मारतीचे मुख्य प्रवेशद्वार इलेक्ट्रॉनिक होते, वीज गेल्यावर ते बंद झाले आणि लोकांचा वाहेर पडण्याचा मार्गच बंद झाला, असे प्रत्यक्षदर्शी मन्सूर याने सांगितले. स्थानिकांनी काच फोडून आत अडकलेल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला.
२ लाख रु. भरपाई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रु. आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली.
दिल्लीतील एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या बहुतांश व्यक्ती या लायबेरिया, नायजेरिया, मोझाविक आणि बांगलादेश या देशांचे नागरिक होते. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
उड्या मारल्यामुळे अनेक रुग्णांची हाडे मोडली
मॅक्स हेल्पकेअर ग्रुपचे वैद्यकीय संचालक डॉ. संदीप बुधिरजा यांनी सांगितले की, आगीपासून बचाव करण्यासाठी वरच्या मजल्यांवरून खाली उज्या मारल्यामुळे अनेक रुग्णांना फ्रैक्चर्स झाले आहेत. बहुतांश रुग्णांच्या हात-पायांना आणि कमरेच्या हाडांना दुखापत झाली आहे. एका रुग्णाला मणक्याची दुखापत झाली असून, सध्या त्याच्यावर मज्जातंतूंची शस्त्रक्रिया सुरू आहे.
मुलाला कवटाळून मातेची तिसऱ्या मजल्यावरून उडी
हॉटेलला आग लागली असताना आपल्या मुलाला वाचवण्यासाठी एका आईने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, आग आणि धुरामुळे बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नसल्याने, त्या महिलेने मुलाला छातीशी कवटाळून उडी मारली. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच स्थानिक रहिवाशांनी हॉटेलच्या खाली रस्त्यावर गाद्या अंथरल्या होत्या. ती महिला आणि तिचे मूल या गाद्यांवर पडल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र, ती महिला जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जर वेळेवर गाद्या अंथरल्या नसत्या, तर ही दुर्घटना आणखी भीषण झाली असती. स्थानिक रहिवासी अनिता चौधरी यांनी सांगितले की, हॉटेलला आग लागल्यानंतर अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. त्यानंतर किंकाळ्या आणि आक्रोश ऐकू येऊ लागला. लोक जीव वाचवण्यासाठी खिडक्यांमधून उड्या मारत होते आणि मदतीसाठी याचना करत होते.