दिल्लीमध्ये IAS कोचिंग क्लासच्या तळघरात शिरलं पावसाचं पाणी; तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

‘आयएएस’ची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा राऊ आयएएस अकादमीच्या कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये मुसळधार पावसामुळे अचानक पाणी भरल्याने बुडून मृत्यू झाला
दिल्लीमध्ये IAS कोचिंग क्लासच्या तळघरात शिरलं पावसाचं पाणी; तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
Published on

नवी दिल्ली : ‘आयएएस’ची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा राऊ आयएएस अकादमीच्या कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये मुसळधार पावसामुळे अचानक पाणी भरल्याने बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी कोचिंग क्लासच्या मालकासह दोघांना अटक केली आहे. श्रेया यादव, नेविन डेल्विन आणि तानिया अशी मृतांची नावे आहेत.

दिल्लीच्या राजेंद्र नगर येथे राऊ कोचिंग सेंटर आहे. जोरदार पावसाचे पाणी या सेंटरच्या बेसमेंटमध्ये भरले. त्याचवेळी इमारतीतील वीज गेली. त्यामुळे बेसमेंटमधील लायब्ररीत ३० विद्यार्थी अडकले. त्याचबरोबर लायब्ररीचा बायोमॅट्रिक दरवाजा जाम झाला. दरवाजे बंद असल्याने सुरुवातीस पाणी बेसमेंटमध्ये घुसले नाही. पण काही मिनिटांत पाण्याचा दबाव वाढला व दरवाजा तुटला. अवघ्या तीन मिनिटांत १२ फूट पाणी बेसमेंटमध्ये शिरले. काही सेकंदात गुडघ्यापर्यंत पाणी आले. काही विद्यार्थी बाकड्यांवर उभे राहिले. विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी दोऱ्या फेकण्यात आला. पण, पाणी खराब असल्याने दोऱ्या दिसल्या नाहीत.

कोचिंग मालक गुप्ता व कोऑर्डिनेटर देशपाल सिंह यांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी विभागीय आयुक्तांना याप्रकरणी मंगळवारपर्यंत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या पाठवण्यात आल्या. रस्त्यावर पाणी असल्याने बेसमेंटमधून पाणी बाहेर येत नव्हते. रस्त्यावरील पाणी कमी झाल्यानंतर बेसमेंटमधील पाणी कमी व्हायला लागले. पंप लावून आम्ही पाणी काढले. त्यानंतर आम्हाला विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले.

पोलिसांनी सांगितले की, या पाण्यात बाकडी तरंगत होती. त्यामुळे मुलांना बाहेर काढण्यात अडचणी निर्माण झाल्या. १४ विद्यार्थ्यांना दोरीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

२०२१ मध्ये एमसीडीने राऊ कोचिंग सेंटरला केवळ बेसमेंटमध्ये साठवणुकीची परवानगी दिली होती. त्यात कोणतेही व्यावसायिक कामास परवानगी नव्हती. या कोचिंग सेंटरमध्ये अवैधपणे लायब्ररी चालवली जात होती.

कारवाई सुरू

या दुर्घटनेप्रकरणी दिल्ली सरकारने न्यायदंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्लीच्या मंत्री अतिशी यांनी मुख्य सचिव नरेश कुमार यांना कोचिंग क्लासच्या बेसमेंटमध्ये पाणी भरणे व विद्यार्थी अडकणे आदी प्रकरणांची न्यायदंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी २४ तासांत या घटनेचा अहवाल सादर करण्यास सांगितले. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. न्यायवैज्ञक पथकाने पुरावे गोळा केले असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. जे कोचिंग क्लास बेसमेंटमध्ये व्यावसायिक काम करत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई करावी, असे आदेश महापौर शैली ओबेरॉय यांनी एमसीडी आयुक्तांना दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in