नवी दिल्ली : इंडिया आघाडीतील दोन राज्यांची सत्ता हाती असलेला महत्त्वाचा घटक पक्ष आम आदमी पक्ष आता काँग्रेसला डोळे वटारून दाखवू लागला आहे. पंजाब, चंदिगडमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या आपने दिल्लीत काँग्रेसला अटींवर लोकसभेला आघाडीचे निमंत्रण दिले आहे. यामध्ये काँग्रेसला आपने सातपैकी एक जागा सोडली आहे. तसेच वेळेत उत्तर दिले तर ठीक, नाहीतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू, असा इशाराच आपने दिला आहे.
काँग्रेसच्या अरेरावी धोरणामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी एकला चालोचा नारा आधीच लावला आहे, तर बिहारमध्ये नितीशकुमार इंडिया आघाडीपासून वेगळे होऊन एनडीएत सामील झाले आहेत. या धक्क्यातून इंडिया आघाडी काही उभी राहण्याच्या परिस्थितीत नाहीय. असे असताना आता केजरीवालांनी दिल्लीत काँग्रेसला अल्टीमेटम दिले आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील अखिलेश यांच्या समाजवादी पक्षाने काँग्रेसला जागा जाहीर करून टाकल्या आहेत. याला काँग्रेसने अद्याप उत्तर दिलेले नाही. आता दिल्लीत आपने काँग्रेसला एक जागा सोडण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. आपचे नेते संदीप पाठक यांनी ही माहिती दिली आहे.