
नवी दिल्ली: भारतीय सैन्याची हेरगिरी केल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दिल्लीतल्या सीलमपूर येथील एका भंगार विक्रेत्याला अटक केली आहे. मोहसीन खान (४५) असे या आरोपीचे नाव असून शनिवारी त्याला दिल्ली उच्च न्यायालयासमोर हजर करण्यात आले तेव्हा न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. न्या. स्वर्ण कांता शर्मा यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्या. शर्मा म्हणाल्या, मोहसीन खान याचे कथित गुन्हे वैयक्तिक अथवा संस्थात्मक हानीपेक्षाही गंभीर आहेत, जे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण करतात. या प्रकरणात दाखल केलेला गुन्हा हा केवळ एखादी विशिष्ट व्यक्ती, संस्था अथवा कुठल्याही गटाविरोधातील गुन्हा नसून भारताची अखंडता, सार्वभौमत्व व सुरक्षेविरोधातील गुन्हा आहे. त्यामुळे या प्रकरणात तूर्त जामीन देता येणार नाही.
एटीएसचा आरोप काय?
दुसऱ्या बाजूला मोहसीनच्या कुटुंबीयांनी त्याला खोट्या प्रकरणात अडकवले जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्याची दुसरी पत्नी पाकिस्तानात असल्याने तो तिकडे जात होता, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, उत्तर प्रदेश एटीएसचा दावा आहे की, मोहसीनचे पाकिस्तानी संस्थांशी संबंध होते. त्याने भारतातील अंतर्गत सुरक्षेसंबंधीची महत्त्वाची माहिती त्यांना दिली आहे.
सौम्य वागणूक नाही
दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून न्या. शर्मा म्हणाल्या, आरोपीची हेरगिरी कृत्ये राष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हान आहे. त्यामुळे त्याला सौम्य वागणूक देता येणार नाही. हेरगिरीची कथित कृत्ये व परकीय संस्थांना संवेदनशील माहिती दिल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर करता येणार नाही.
पोखरणची माहिती दिली
मोहसिन खानचे मोबाइल दुरुस्ती व रिचार्जचे दुकानही आहे. तो हेरगिरी करणाऱ्या सिंडिकेटचा भाग असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तसेच पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याकडून त्याने पैसे मिळवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. तसेच त्याने पोखरण येथे भारतीय सैन्यातील परमजीत कुमारकडून मिळालेली माहिती बेकायदेशीरपणे परदेशी संस्थेला विकल्याचा दावा एटीएसने केला आहे. हे सगळे आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांना आरोपीची चौकशी करायची आहे. त्यामुळे न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली आहे.