दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर-आयुष्यमान ११.९ वर्षांनी कमी होण्याची शक्यता

सरासरी भारतीय नागरिकांचे आयुष्यमान ५.३ वर्षांनी कमी होत आहे
दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर-आयुष्यमान ११.९ वर्षांनी कमी होण्याची शक्यता

नवी दिल्ली : दिल्लीने जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून अपकीर्ती मिळवली आहे. जर प्रदूषणाची पातळी अशीच राहिली तर दिल्लीकरांचे आयुष्य ११.९ वर्षांनी कमी होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासात ही बाब उघडकीस आली आहे.

शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने जगातील विविध शहरांतील प्रदूषणाचा अभ्यास करून एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स (एक्यूएलआय) जाहीर केला आहे. या अभ्यासाच्या अहवालानुसार भारतातील १.३ अब्ज नागरिक प्रदूषित विभागात राहतात. तेथे वार्षिक प्रदूषणाचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आखून दिलेल्या मानकांपेक्षा अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार हवेतील प्रदूषणकारी कणांचे कमीत कमी प्रमाण ५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके आहे. मात्र, भारतातील बहुतांश शहरांत त्यापेक्षा अधिक प्रदूषण असल्याचे आढळून आले आहे.

भारताच्या स्वत:च्या मानकांनुसार ४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा अधिक प्रदूषण हानिकारक आहे, पण देशातील ६७.४ टक्के नागरिक यापेक्षा जास्त प्रदूषण असलेल्या वातावरणात राहतात. हवेतील प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कण आरोग्याला अत्यंत घातक असतात. त्यांना पीएम २.५ असे संबोधले जाते. या कणांचा आकार २.५ मायक्रॉन्सपेक्षा कमी असतो. देशातील हवेत अशा प्रकारच्या अतिसूक्ष्म कणांचे प्रमाण इतके आहे की, त्यामुळे सरासरी भारतीय नागरिकांचे आयुष्यमान ५.३ वर्षांनी कमी होत आहे.

शिकागो विद्यापीठाच्या अभ्यासानुसार पंजाबमधील पठाणकोट हा भारतातील सर्वात कमी प्रदूषित जिल्हा आहे. मात्र, तेथेही प्रदूषणाचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या मानकांनुसार सात पटींनी अधिक आहे. प्रदूषणामुळे तेथील नागरिकांचे आयुष्य ३.१ वर्षांनी कमी होण्याची भीती आहे.

साधारणत: उत्तर भारतातील प्रदूषणासाठी तेथील भौगोलिक परिस्थितीचे कारण दिले जाते. मात्र, या अभ्यासात असे दिसून आले की, मानवी कारवायांचा तेथील प्रदूषणात मोठा हात आहे. कारखाने, वाहने आदी कारणांनी होणारे मानवनिर्मित प्रदूषण तेथील हवेचा दर्जा घसरवण्यात मोठी भूमिका बजावत आहे.

विकसनशील देशांवर सर्वाधिक परिणाम

मायकेल ग्रीनस्टोन हे शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स (एक्यूएलआय) या प्रकल्पाचे निर्माते आणि मिल्डन फ्रीडमन डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस प्रोफेसर आहेत. त्यांच्या मते, प्रदूषणामुळे नागरिकांचे आयुष्य कमी होण्याचे तीन चतुर्थांश प्रमाण जगातील केवळ सहा देशांत दिसून येते. त्यात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, चीन, नायजेरिया, इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे. प्रदूषणामुळे या देशांतील नागरिकांचे आयुष्य एक ते सहा वर्षांनी कमी होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in