वाढत्या प्रदूषणाने लावली वाट दिल्लीपाठोपाठ मुंबईची घुसमट; दिल्लीत AQI ३५९, मुंबईतील AQI २०० वर, फटाके फोडण्याच्या मर्यादांचे सर्रास उल्लंघन

वाढत्या प्रदूषणाने ऐन दिवाळीत राजधानी दिल्लीपाठोपाठ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची वाट लागली असून हवेच्या प्रदूषणामुळे नागरिकांची घुसमट होत आहे. दिल्लीत एक्यूआय ३५९, मुंबईतील एक्यूआय २०० वर पोहोचल्याने प्रदूषणाने गंभीर वळण घेतले आहे.
वाढत्या प्रदूषणाने लावली वाट दिल्लीपाठोपाठ मुंबईची घुसमट; दिल्लीत AQI ३५९, मुंबईतील AQI २०० वर, फटाके फोडण्याच्या मर्यादांचे सर्रास उल्लंघन
Published on

मुंबई/नवी दिल्ली: वाढत्या प्रदूषणाने ऐन दिवाळीत राजधानी दिल्लीपाठोपाठ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची वाट लागली असून हवेच्या प्रदूषणामुळे नागरिकांची घुसमट होत आहे. दिल्लीत एक्यूआय ३५९, मुंबईतील एक्यूआय २०० वर पोहोचल्याने प्रदूषणाने गंभीर वळण घेतले आहे.

दिवाळीनंतरच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी सकाळी दिल्लीतील आकाश धुरकट धुक्यात हरवले. सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या दोन तासांच्या मयदिपेक्षा अधिक वेळ फटाके फोडल्यामुळे राजधानीतील हवेचा दर्जा 'रेड झोन' मध्ये पोहोचला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ११ वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३५९ नोंदवला गेला, जो 'अतिशय खराब' श्रेणीत मोडतो. सकाळी ८ वाजता तो ३५२, तर ५ वाजता ३४६, ६ वाजता ३४७ आणि ७वाजता ३५१ नोंदवला गेला.

दिल्लीतील ३८ केंद्रांपैकी ३५ केंद्रांवरील हवा 'रेड झोन' मध्ये नोंदवली गेली. ती 'अतिशय खराब' ते 'गंभीर' या श्रेणीत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 'समीर' अपनुसार, ३१ केंद्रे 'अतिशय खराब' श्रेणीत आणि चार केंद्रे 'गंभीर' श्रेणीत होती. जहांगीरपुरी येथे हवा गुणवत्ता निर्देशांक ४०९, वझीरपूर ४०८, बवाना ४३२ आणि बुरारी २०५ नोंदवला गेला.

मुले गुदमरताहेत

पर्यावरण कार्यकर्त्या भावना कंधारी यांनी सांगितले, दिल्लीसाठी हा गंभीर इशारा आहे. सर्व निरीक्षण केंद्रे 'रेड झोन' मध्ये गेली असून एक्यूआय ३०० च्या वर गेला आहे. ही जागृतीची वेळ आहे. सध्याचे धुके केवळ आकाश झाकत नाही, तर आपल्या मुलांच्या फुफ्फुसांना गुदमरवत आहे,' असेही त्यांनी म्हटले.

भारतात श्वसनाच्या आजारांचे प्रमाण आधीच सर्व संक्रामक रोगांपैकी जवळपास ७० टक्के आहे आणि देश जगात दीर्घकालीन श्वसन विकारांमध्ये अग्रणी आहे, असे त्यांनी सांगितले.

मंगळवार आणि बुधवारी हवेचा दर्जा अधिकाधिक 'गंभीर' श्रेणीत जाण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. हरयाणाच्या जिंदमध्ये हवेचा निर्देशांक ४२१, तर रेवाडीत तो ४१२ वर गेला. रोहटक ३७६, गुरुग्राम ३७०, बहादूरगड ३६८, सिरसा ३५३, माणेसर ३२०, चरखी दादरी ३५३ एक्यूआय नोंदवला गेला.

मुंबईत हवेचा निर्देशांक २११ वर

मुंबईचा हवेचा दर्जा निर्देशांक (एक्यूआय) मंगळवारी २११ वर पोहोचला, जो 'खराब' या श्रेणीत मोडतो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार, मुंबईतील सर्वात प्रदूषित क्षेत्र वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स राहिले असून, तिथे एक्यूआय ३७७ नोंदवला गेला. सर्वाधिक प्रदूषित क्षेत्रांमध्ये नेव्ही नगर (कुलाबा)- ३४०, माझगाव ३०२, मालाड पश्चिम- २८२, भायखळा २७४, वरळी-२७४, देवनार-२७१, चेंबूर- २५१, अंधेरी पूर्व २४९, बोरिवली पूर्व-२३२ आणि इतर भागांचा समावेश आहे.

संस्थेने विविध कंपन्यांनी तयार केलेल्या २५ प्रकारच्या फटाक्यांची यादी जाहीर केली. त्यात या फटाक्यांचे यंदा रासायनिक तपासणीसाठी नमुने घेतले गेले. बहुतांश फटाक्यांवर आवाजाची पातळी नमूद केलेली नव्हती, तर काहींवर आवश्यक 'क्यूआर' कोडही नव्हता, असे संस्थेने म्हटले आहे. अनेक फटाक्यांच्या पॅकेजिंगवर नमूद केलेली रासायनिक रचना आणि प्रयोगशाळेत आढळलेली प्रत्यक्ष सामग्री यात मोठा फरक असल्याचा दावा करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, 'ब्ल्यूबेरी' या फटाक्यांच्या लेबलवर रासायनिक संरचना अशी दिली होती. पोटॅशियम नायट्रेट (५५%), अॅल्युमिनियम (२०%), गंधक (१५%) आणि झिओलाइट (१०%). मात्र प्रयोगशाळेतील तपासणीत अल्युमिनियम (३६.५७%), पोटॅशियम (१६.८५१%), गंधक (४.०५%), सिलिकॉन (०.१४८%) आणि ऑक्सिजन (४२.२४९%) असे घटक आढळले.

जीवनापेक्षा फटाके महत्त्वाचे ठरले

दिल्लीतील हवेची गुणवत्ता पूर्ण खराब झाली आहे. तरीही न्यायालयाने जगण्याचा आणि श्वास घेण्याचा अधिकार बाजूला ठेवून फटाके फोडण्याच्या अधिकाराला प्राधान्य दिले आहे, अशी टीका निवृत्त नोकरशहा अमिताभकांत यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, नवी दिल्लीतील प्रदूषणावर मात करायची असल्यास निर्दयी व सातत्यपूर्ण अंमलबजावणी करावी लागेल, अन्यथा दिल्लीला 'आरोग्य आणि पर्यावरणीय आपत्ती'चा सामना करावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या बुद्धीनुसार फटाके फोडण्याच्या अधिकाराला जगण्याचा आणि श्वास घेण्याच्या अधिकारापेक्षा वरचढ ठरवले आहे. दिल्ली आजही जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानींपैकी एक आहे. लॉस एंजलिस, बीजिंग आणि लंडन हे प्रदूषण कमी करू शकतात, तर दिल्ली का नाही? केवळ निर्दय आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणीच दिल्लीला या आरोग्य व पर्यावरणीय संकटातून वाचवू शकते," असे कांत यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले, एक एकत्रित कृती आराखडा अत्यावश्यक आहे. पिकांची आणि जैविक कचरा जाळणे बंद करणे, थर्मल पॉवर प्लांट्स आणि वीटभट्ट्यांचे आधुनिकीकरण करून स्वच्छ तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, २०३० पर्यंत संपूर्ण वाहतूक व्यवस्था विद्युत करण्याकडे नेणे, बांधकामातील धुळीवर कठोर नियंत्रण ठेवणे, कचऱ्याचे पूर्ण विभाजन आणि प्रक्रिया सुनिश्चित करणे आणि दिल्लीची पुनर्रचना हरित, चालण्याजोग्या आणि सार्वजनिक वाहतुकीवर आधारित जीवनशैलीभोवती करणे. फक्त अशी ठाम आणि अखंड अंमलबजावणीच शहराचे निळे आकाश आणि श्वास घेण्यासारखी हवा पुन्हा परत आणू शकते, असे त्यांनी सांगितले.

फटाक्यांमध्ये विषारी जड धातूचा वापर

मुंबई : यंदा सुरू असलेल्या दिवाळी उत्सवात फटाके फोडल्यामुळे हवेत अत्यंत विषारी जड धातूंचे उत्सर्जन झाल्याचा दावा 'आवाज फाऊंडेशन' या स्वयंसेवी संस्थेने केला आहे. विषारी फटाक्यांच्या वापरावर नियंत्रण आणण्यात आणि नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. वर्षानुवर्षांच्या तपासणी आणि जनजागृतीनंतरही, राज्य सरकारला विषारी फटाके फोडण्यामुळे होणारे आरोग्याचे दुष्परिणाम रोखण्यात अपयश आले आहे, असे आवाज फाऊंडेशनने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे

logo
marathi.freepressjournal.in