

नवी दिल्ली : माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या अप्रकाशित पुस्तकाच्या कथित लीक प्रकरणाची चौकशी आता अधिक तीव्र करण्यात आली असून दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने यासंदर्भात प्रकाशन संस्था 'पेंग्विन रँडम हाऊस इंडिया'वर नोटीस बजावून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितले आहे.
पोलिसांनी प्रकाशकाकडून पुस्तकाच्या प्रकाशन प्रक्रियेची माहिती, हस्तलिखिताच्या सुरक्षाव्यवस्थेचे तपशील, डिजिटल फाइल्सची उपलब्धता आणि संभाव्य लीकचा स्रोत आदींबाबत माहिती मागवली आहे. लवकरच कंपनीच्या प्रतिनिधींची चौकशी होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी या संवेदनशील प्रकरणात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला होता. अलीकडे सोशल मीडियावर आणि काही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर या पुस्तकाची टाइपसेट पीडीएफ प्रत आणि कव्हर डिझाइन प्रसारित झाल्याचे दावे समोर आले होते. प्राथमिक तपासात प्रकाशकाने तयार केलेली एक डिजिटल फाइल काही वेबसाइटवर उपलब्ध झाल्याचे निदर्शनास आले होते. तसेच काही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पुस्तकाचे पूर्ण कव्हर दर्शवले जात असल्याने पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचा भ्रम लोकांमध्ये निर्माण झाला होता.
दिल्ली पोलिसांच्या मते, हे प्रकरण केवळ कॉपीराइट उल्लंघनापुरते मर्यादित नसून प्रकाशनापूर्वी गोपनीय कंटेन्ट बाहेर जाण्याचा गंभीर मुद्दाही यात समाविष्ट असू शकतो. संबंधित पुस्तक देशाच्या माजी लष्करप्रमुखांशी संबंधित असल्याने तपासादरम्यान राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रशासकीय संवेदनशीलतेचा विचार केला जात आहे.
संस्थेचे स्पष्टीकरण
दरम्यान, 'पेंग्विन रँडम हाऊस इंडिया'ने एफआयआरनंतर स्पष्टीकरण देत सांगितले की, हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही. कोणतीही अधिकृत मुद्रित किंवा डिजिटल प्रत सार्वजनिकरीत्या जारी करण्यात आलेली नाही. प्रकाशनाचे सर्व हक्क कंपनीकडे सुरक्षित असून प्रसारित होत असलेली कोणतीही माहिती बेकायदेशीर आणि कॉपीराइट उल्लंघनाच्या कक्षेत येते, असे कंपनीने स्पष्ट केले.
तांत्रिक पुराव्यांची तपासणी
या कथित लीक प्रकरणाची चर्चा संसदेतही झाली असून काही खासदारांनी परवानगीशिवाय पुस्तकातील कंटेन्ट सार्वजनिक झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सध्या स्पेशल सेल हा मजकूर कोणत्या माध्यमातून बाहेर गेला, त्यात कोणाची भूमिका होती का, हा प्रकार कोणत्याही सुनियोजित कटाचा भाग होता का, याचा तपास करत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म, वेबसाइट्स आणि तांत्रिक पुरावे यांचीही सखोल तपासणी सुरू आहे. सर्व तथ्ये समोर आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.