अमित शहा व्हिडिओप्रकरणी तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांना समन्स; दिल्ली पोलिसांकडून १ मे रोजी चौकशीसाठी पाचारण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ‘एडिटेड व्हिडिओ’ सोशल मीडियात प्रसारित केल्याबाबत दिल्ली पोलिसांनी तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
अमित शहा व्हिडिओप्रकरणी तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांना समन्स; दिल्ली पोलिसांकडून १ मे रोजी चौकशीसाठी पाचारण

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ‘एडिटेड व्हिडिओ’ सोशल मीडियात प्रसारित केल्याबाबत दिल्ली पोलिसांनी तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना १ मे रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.

अमित शहा यांच्या एडिटेड व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांनी रविवारी एफआयआर नोंदवला होता. सदर व्हायरल व्हिडिओमध्ये शहा एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण संपवण्याबाबत बोलताना दिसत आहेत. मात्र, यासंबंधी करण्यात आलेल्या तथ्य तपासणीमध्ये हा व्हिडिओ बनावट असल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी भाजप आणि गृह मंत्रालयाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या फोनचीही पोलीस तपासणी करणार

तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह तेलंगण कॉंग्रेसच्या पाच सदस्यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस जारी केली आहे. या नोटिशीमध्ये रेड्डी यांना त्यांचा फोनही आणण्यास सांगितले आहे. रेड्डी यांच्या फोनचीही पोलीस तपासणी करणार आहेत. रेवंत रेड्डी यांनी अमित शहांचा हा फेक व्हिडिओ त्यांच्या ‘एक्स’ अकाउंटवरून शेअर केला होता. हा व्हिडिओ तेलंगणा काँग्रेसच्या अधिकृत अकाऊंटसह पक्षाच्या अनेक नेत्यांनीही शेअर केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in