नवी दिल्ली : दिल्लीत वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत गुरुवारपासून काही नियम लागू करण्यात आले आहेत. दिल्लीत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच बीएस-६ वाहनांनाच दिल्लीच्या रस्त्यावर धावण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे बदल गुरुवारपासून लागू झाले आहेत.
१३ डिसेंबर पासून सलग तीन दिवस दिल्लीतील हवा ‘गंभीर’ श्रेणीत होती. त्यामुळे दिल्लीतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने तातडीने काही उपाययोजना केल्या आहेत. हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने वायू प्रदूषण रोखण्यासाठी ग्रॅप-४ची घोषणा केली होती. त्याअंतर्गत अवजड वाहनांना दिल्लीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच बीएस-६ वाहनांनाच दिल्लीत प्रवेश दिला जाणार आहे.
दिल्लीचे कामगारमंत्री कपिल मिश्रा यांनी दिल्लीतील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे आवाहन केले आहे. सगळ्या खासगी तसेच सरकारी संस्थांना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. निम्म्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम न दिल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मिश्रा यांनी दिला. दरम्यान, अत्यावश्यक सेवा तसेच आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिले जाणार नसल्याचे सांगण्यात आले.
वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीतील बांधकामे थांबवण्यात आली आहेत. बांधकामे थांबवल्याने परिणाम होणार्या मजुरांना तसेच कर्मचाऱ्यांना १० हजार रूपये नुकसान भरपाई सरकारकडून दिली जाणार आहे. त्यासाठी मजूर व कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरू असल्याची माहिती मिश्रा यांनी दिली.
दिल्लीत पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपांवर इंधन दिले जाणार नाही, तसेच प्रदूषण करणाऱ्या वाहनांशी संबंधित नियम आणखी कठोर केले जातील, असे पर्यावरण मंत्री मजिंदरसिंग सिरसा यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी अवजड वाहनांना दिल्लीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच बांधकामांशी संबंधित साहित्य घेऊन येणाऱ्या अवजड वाहनांना आजपासून दिल्लीत प्रवेश बंदी आहे, अशी माहिती सिरसा यांनी दिली. तसेच बीएस-६ नसलेल्या अवजड वाहनांना दिल्लीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. १२ लाख वाहनांना फटका दिल्ली सरकारच्या या निर्णयाचा फटका शेजारील गुरुग्राम, गाझियाबाद, फरिदाबाद आणि नोएडा येथून दिल्लीत येणाऱ्या सुमारे १२ लाख वाहनांना बसणार आहे.