नवी दिल्ली : डोंगराळ भागातील राज्यांपासून ते सपाट प्रदेशांमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सततच्या पावसामुळे यमुना नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे अनेक भागात पूर आला आहे. नोएडामधील सेक्टर-१३५ आणि सेक्टर-१५१ पाण्याखाली गेले आहेत. अनेक भागात ३ ते ४ फूट पाणी भरले आहे.
हरियाणातील पंचकुला, हिसार, रोहतक आणि झज्जरमधील सर्व शाळा बंद आहेत. फतेहाबाद, कुरुक्षेत्र, यमुनानगर आणि फरिदाबादमध्येही काही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. गुरुग्रामच्या सिग्नेचर ग्लोबल सलोरा सोसायटीमध्ये गुरुवारी पाणी शिरले होते. त्यामुळे महिला आणि मुले त्यांच्या घरात अडकली होती.
राजस्थानमधील अजमेर येथे गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बोराज तलावाची भिंत कोसळली. त्यामुळे १ हजाराहून अधिक घरांमध्ये अचानक पाणी शिरले. लोकांनी छतावर जाऊन आपले प्राण वाचवले. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की अनेक वाहने वाहून गेली. घरांचे नुकसान झाले. लोकांना बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.
मृतांची संख्या ४३ वर
गुरुवारी पंजाबमधील पुरात मृतांचा आकडा ४३ वर पोहोचला. राज्यातील २३ जिल्ह्यांमधील १,६५५ गावांमध्ये ३.५५ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. १.७१ लाख हेक्टर जमिनीवरील पिके नष्ट झाली आहेत. पुढील ५ दिवस राज्यात पावसाचा इशारा नाही. यामुळे पुरापासून दिलासा मिळू शकतो.