
नवी दिल्ली : येत्या दोन वर्षांत येथील सुमारे १० लाख भटक्या कुत्र्यांना मायक्रोचिप लावली जाणार आहे, अशी घोषणा दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा यांनी बुधवारी यांनी केली.
दिल्ली सचिवालयात प्राणी कल्याण मंडळाची बैठक झाली ज्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) च्या सहकार्याने पुढील दोन वर्षांत दिल्लीतील सुमारे १० लाख भटक्या कुत्र्यांना मायक्रोचिप लावली जाणार आहे.
बैठकीचे उद्दिष्ट प्राणी कल्याणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर विचारमंथन करणे आणि दिल्लीसाठी ठोस कृती आराखडा तयार करणे हे होते. यावेळी राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रमावरही चर्चा झाली.
जागतिक रेबीज दिन जवळ येत असल्याने दिल्लीमध्ये रेबीज नियंत्रणासाठी सर्वसमावेशक उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवणे आणि लसीकरण प्रक्रियेचे डिजिटायझेशन यांचा समावेश आहे.
मिश्रा यांनी शक्य तितक्या लवकर कुत्र्यांची जनगणना आणि त्यांच्यावर पाळत ठेवणारी यंत्रणा तयार करण्याचे निर्देश दिले. जेणेकरून अचूक माहिती मिळेल आणि भविष्यातील नियोजन अधिक मजबूत होईल.
बैठकीत आणखी एक निर्णय घेण्यात आला की दिल्लीतील पाळीव प्राणी दुकाने नोंदणीकृत करणे बंधनकारक करण्यात येईल आणि त्यासाठी विशेष निरीक्षण समिती स्थापन केली जाईल.
मिश्रा म्हणाले की, सर्व संबंधित नियम लवकरच अंमलात आणले जातील आणि प्रत्येक प्रादेशिक समितीला सक्रीय करून स्थानिक स्तरावर निरीक्षण व कारवाई सुनिश्चित केली जाईल.