

नवी दिल्ली : देशभरात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि पोलिसांच्या कारवाईवर लोकसभेत पूर्ण चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी सोमवारी जाहीर केले. विरोधकांनी सभागृहात कोणताही गदारोळ न करता शांततेने चर्चा ऐकण्याची ग्वाही दिल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या चर्चेला उत्तर देतील, असे रिजिजू यांनी स्पष्ट केले.
लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पुढील तीन दिवसांच्या कामकाजाबाबत चर्चा झाल्यानंतर रिजिजू यांनी पत्रकारांशी ही माहिती दिली. दिल्लीत गेल्या महिन्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाईबाबत गृहमंत्र्यांनी निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे.
रिजिजू म्हणाले, विद्यार्थी आणि युवकांच्या आंदोलनावर तसेच पोलीस कारवाईवर पूर्ण चर्चा करण्यास सरकार तयार आहे. अमित शहा सरकारच्या वतीने प्रत्येक मुद्द्याचे उत्तर देतील. परंतु, विरोधकांनी सभागृहाचे कामकाज विस्कळीत न करता शांततेने उत्तर ऐकावे आणि काही ना काही कारण काढून सभागृहातून काढता पाय घेऊ नये.
राम मंदिर चोरीवरून विरोधक आक्रमक
अयोध्या राम मंदिरातील देणगीच्या कथित चोरीवरही संसदेत चर्चा होणार का, असे विचारले असता रिजिजू म्हणाले की, उत्तर प्रदेश सरकार एसआयटीद्वारे या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि राज्यस्तरावर आवश्यक पावले उचलली जात आहेत.