
नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी पहिल्यांदाच १ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. त्यांनी महिला समृद्धी योजनेसाठी ५,१०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा २,५०० रुपये दिले जाणार आहेत, तर यमुना नदी व सांडपाणी सफाईसाठी ९ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
आयुष्मान योजनेसाठी २,१४४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेत केंद्राकडून ५ लाख, तर राज्याकडून ५ लाख रुपयांची मदत केली जाईल. म्हणजेच दिल्लीकरांना १० लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळेल. ‘आप’ने शीशमहल बनवला तर आम्ही गरीबांसाठी घरे बनवू. आम्ही झोपडपट्टीवासीयांसाठी प्रसाधनगृहे बनवू, असे गुप्ता म्हणाल्या.
मातृत्व वंदन योजनेसाठी २१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात गर्भवती महिलांना एकाचवेळी २१ हजार रुपये दिले जातील. तसेच दिल्लीत महिला सुरक्षेसाठी ५० हजार अतिरिक्त कॅमेरे लावले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दिल्लीत ‘अटल कँटीन’ उघडले जाणार आहेत. त्यात ५ रुपयांत जेवण मिळणार आहे, तर रस्ते सुधारण्यासाठी ३,८०० कोटींची तरतूद केली आहे, असे त्यांनी सांगितले.