
नवी दिल्ली : महिलांना दरमहा २,५०० रुपये, झोपडपट्ट्यांमध्ये अटल कँटीन योजनेंतर्गत गरीबांना ५ रुपयात जेवण, ५०० रुपयात सिलिंडर, दिवाळी-होळीला मोफत सिलिंडर, गर्भवती महिलांना २१ हजार आदी घोषणा भाजपने आपल्या निवडणूक संकल्पपत्रात केल्या आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी दिल्ली निवडणुकीसाठी भाजपचे संकल्पपत्र जाहीर केले. हे संकल्पपत्र म्हणजे विकसित दिल्लीचा पाया घालणारे आहे, असे नड्डा म्हणाले.
दिल्लीत वीज, बस व पाणीबाबतच्या विद्यमान सरकारच्या योजना सुरूच राहतील. ६०-७० वर्षांच्या ज्येष्ठांना मिळणारी पेन्शन २ हजारवरून २,५०० रुपये केली जाईल. विधवा, दिव्यांग व ७० वर्षांवरील ज्येष्ठांना ३ हजार पेन्शन मिळेल, असे भाजपच्या संकल्पपत्रात म्हटले आहे.
नड्डा म्हणाले की, आप सरकारने दिल्लीतील ज्येष्ठ नागरिकांना धोका दिला आहे. आप सरकार गरीबांना त्रास देण्याचे काम करत आहे. ‘आप’चे मोहल्ला क्लिनिक म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा आहे. या क्लिनिकमध्ये खोट्या चाचण्या करून ३०० कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर याची चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले.
केंद्राची आयुष्मान भारत योजना दिल्लीत लागू केली जाईल. तसेच प्रत्येकाला अतिरिक्त ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाईल. याचाच अर्थ दिल्लीकरांना १० लाख रुपयांचा विमा मिळू शकेल. तसेच ७० वर्षांवरील दिल्लीकरांना मोफत ओपीडी व निदान चाचण्या केल्या जातील.
दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचाराची चौकशी करणार - नड्डा
कोरोना काळात अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या नागरिकांना फसवण्याचे काम केले. ऑक्सिजनबाबत त्यांच्याशी खोटे बोलण्यात आले. दिल्ली सरकारच्या सर्व योजनांची चौकशी केली जाईल व भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा देण्यात येईल, असे नड्डा म्हणाले.