शेतकरी आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत जमावबंदी

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत एका महिन्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
शेतकरी आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत जमावबंदी

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत एका महिन्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून परिस्थिती हाताळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.

दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय राजधानीत एका महिन्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लागू केले आहे.

कलम १४४ लागू झाल्यामुळे दिल्लीत सभा, मिरवणूक किंवा रॅली आयोजित करण्यावर आणि नागरिकांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या प्रवेशावर पूर्ण बंदी असेल.

पंजाब (किसान मजदूर संघर्ष कमेटी) केएमएससीचे अध्यक्ष सुखविंदर सिंग सभारा यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी २०० शेतकरी संघटना दिल्लीकडे कूच करतील. अपूर्ण राहिलेले आंदोलन पूर्ण करण्यासाठी ९ राज्यांतील शेतकरी संघटना संपर्कात आहेत. पुद्दुचेरी, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरयाणा, राजस्थान आणि पंजाब ही सर्व राज्ये आंदोलनासाठी सज्ज आहेत. मात्र दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, कोणत्याही प्रकारची रॅली किंवा मिरवणूक काढण्यावर आणि रस्ते रोखण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश १२ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत लागू असेल. दिल्ली पोलिसांच्या आदेशानुसार, ट्रॅक्टर रॅलींना राष्ट्रीय राजधानीच्या सीमा ओलांडण्यास बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ट्राफिक ॲडव्हायजरी जारी केला आहे.

मार्चदरम्यान पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. ११ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या दिल्ली पोलिस आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे की संयुक्त किसान मोर्चा, किसान मजदूर मोर्चा आणि इतर अनेक शेतकरी युनियन आणि संघटनांनी त्यांच्या मागण्यांसाठी संसदेबाहेर आंदोलन करण्यासाठी १३ फेब्रुवारी रोजी 'दिल्ली चलो' आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

शेतकरी आंदोलनाबाबत गुरुग्राम प्रशासनही सतर्क झाल्याचे पाहायला मिळाले. हरियाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन पाहता कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. गुरुग्रामच्या जिल्हा प्रशासनाकडूनही दक्षता घेण्यात येत आहे.

पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी नवी दिल्लीत कूच करण्याची तयारी चालवली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंजाब-हरयाणाच्या शंभू बॉर्डरवर सोमवारी पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडून जमावाला नियंत्रित करण्याचा सराव केला.

logo
marathi.freepressjournal.in