नवी दिल्ली : पत्नीने पतीला शारीरिक संबंधांस विरोध करणे ही 'मानसिक क्रौर्य' आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोट घेण्यासाठी हे कारण योग्य आहे, असे महत्त्वाचे निरिक्षण मध्यप्रदेश हायकोर्टाने नोंदवताना कौटुंबिक न्यायालयाचा पतीला घटस्फोट नाकारणारा निकाल रद्द ठरवला.
सुदिप्तो साहा याने मध्य प्रदेश हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, सुदिप्तो आणि मौमिता साहा यांचा १२ जुलै २००६ रोजी विवाह पश्चिम बंगालमध्ये झाला होता. लग्नानंतर मौमितानं सुदीप्तोकडे लग्न मोडण्याचा आग्रह धरला. तसेच, आपल्याला प्रियकराकडे जाण्याची परवानगी द्यावी, असाही तगादा मौमिताने सुदीप्तोच्या मागे लावला. भोपाळमध्ये आपल्या घरी पोहोचल्यानंतरही तिनं लग्न मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला. लग्नाच्या दिवसापासून २८ जुलै २००६ रोजी सुदिप्तो देश सोडून जाईपर्यंत मौमिताने त्याला शारीरिक संबंध ठेवण्यास सतत नकार दिला. मौमिताने लग्नाचा अर्थच पूर्ण होऊ दिला नाही. लग्नापूर्वी मौमिताचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते, पालकांना ते अमान्य असल्यामुळे त्यांनी तिच्यावर दबाव टाकत सुदिप्तोशी लग्न करण्यास भाग पाडले. त्यामुळे मौमिता सप्टेंबर २००६ मध्ये भोपाळमधील आपले सासरचे घर सोडून गेली ती परतलीच नाही, असे सुदिप्तोने याचिकेत म्हटले आहे. सुदिप्तोने न्यायालयात सांगितले की, मौमिताने प्रकरण मिटवण्यासाठी त्याच्या वडिलांकडून तब्बल १० लाख रुपये उकळले. एवढेच नाहीतर, भोपाळ पोलीस स्थानकात आणखी एक तक्रार दाखल केल्यानंतर घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या केल्या.
मौमिताने सक्षम न्यायालयासमोर स्वाक्षरी केलेली याचिका सादर करण्यास नकार दिला. यानंतर सुदीप्तोने घटस्फोटासाठी भोपाळ न्यायालयात धाव घेतली, परंतु घटस्फोटासाठी कोणतेही कारण नसल्याचे सांगत न्यायालयाने त्याची विनंती फेटाळली. त्यानंतर त्याने मध्यप्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विनय सराफ यांच्या खंडपीठाने सुदीप्तोला घटस्फोट देण्यास नकार देणारा कौटुंबिक न्यायालयाचा २०१४ चा निर्णय रद्द करत ‘शारीरिक जवळीक नाकारणं म्हणजे, मानसिक क्रूरता आहे,’ अशी टिप्पणी केली.