विक्रम मिसरी नवे परराष्ट्र सचिव; १५ जुलैपासून स्वीकारणार कार्यभार

मिसरी यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तीन पंतप्रधानांसोबत काम केले आहे. त्यांनी माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, डॉ. मनमोहन सिंग व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम केले.
विक्रम मिसरी नवे परराष्ट्र सचिव; १५ जुलैपासून स्वीकारणार कार्यभार

नवी दिल्ली : विद्यमान उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिसरी हे भारताचे नवे परराष्ट्र सचिव असणार आहेत. १९८९ च्या तुकडीतील भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी असलेले मिसरी १५ जुलैपासून पदाचा कार्यभार स्वीकारतील, असे सरकारने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. ते विद्यमान परराष्ट्र सचिव विनय क्वाट्रा यांची जागा घेतील.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीने मिसरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

मिसरी यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तीन पंतप्रधानांसोबत काम केले आहे. त्यांनी माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, डॉ. मनमोहन सिंग व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम केले. विशेष म्हणजे ते चीन या विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी बीजिंगमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही काम केले. जानेवारी २०२२ मध्ये त्यांची नेमणूक राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात करण्यात आली.

२०२० च्या पूर्व लडाख, गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर मिसरी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग प्रशासनासोबत योग्य तो संवाद साधण्याचे कौशल्य दाखवले होते. १९६४ मध्ये श्रीनगरमध्ये जन्मलेल्या मिसरी यांनी आपले प्राथमिक शिक्षण ग्वाल्हेरमध्ये पूर्ण केले. दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधून त्यांनी इतिहास विषयात पदवी घेतली, तर ‘एक्सएलआरआय’मधून त्यांनी एमबीए केले.

logo
marathi.freepressjournal.in