समर्पित नेता लालकृष्ण अडवाणी

अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर हा सन्मान मिळवणारे अडवाणी भाजपचे दुसरे नेते आहेत.
समर्पित नेता लालकृष्ण अडवाणी

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर हा सन्मान मिळवणारे अडवाणी भाजपचे दुसरे नेते आहेत. हिंदुत्वाचे राजकारण आणि रथयात्रेच्या माध्यमातून राम मंदिर आंदोलनाची ज्योत प्रज्वलित करण्यापासून ते भाजपला राष्ट्रीय पक्ष बनवण्यापर्यंत अडवाणींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना उपपंतप्रधान होण्याचा बहुमान मिळाला, पण पंतप्रधानपदापर्यंत पोहचता आले नाही.

लालकृष्ण अडवाणी यांनी भाजप अर्थात भारतीय जनता पक्षाच्या पायाभरणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते भाजपचे संस्थापक सदस्य आहेत. १९८० मध्ये भाजपच्या स्थापनेच्या वेळी ते पक्षाचे मजबूत आधारस्तंभ होते. लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेले नेते आहेत. लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात झाला. त्यांचा २५ फेब्रुवारी १९६५ रोजी कमला यांच्याशी विवाह झाला. त्यांना दोन मुले असून मुलीचे नाव प्रतिभा अडवाणी आहे. कराचीच्या सेंट पॅट्रिक स्कूलमधून त्यांनी सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. फाळणीनंतर भारतात आल्यावर त्यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली.

लालकृष्ण अडवाणी यांनी दीर्घकाळ संघ प्रचारक म्हणून काम केले. सुरुवातीपासूनच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याकडे ओढा होता. १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा लालकृष्ण अडवाणी हे स्वातंत्र्य साजरे करू शकले नाहीत कारण त्यावेळी ते पाकिस्तानात होते. देशाच्या फाळणीनंतर त्यांना त्यांचे घर सोडून कराचीहून दिल्लीला यावे लागले. त्यांनी राजस्थानमध्ये संघाचा प्रचार सुरू केला.

राजस्थानहून दिल्लीत आल्यानंतर अडवाणी ज्या घरात राहत होते ते पहिले घर अटलबिहारी वाजपेयी यांचे अधिकृत निवासस्थान होते. दिल्लीतील एका कार्यालयात सुमारे १५ वर्षे काम केल्यानंतर अडवाणींनी पत्रकार म्हणून आपल्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला. १६६० मध्ये त्यांनी ऑर्गनायझरमध्ये सहाय्यक संपादक पद स्वीकारले.

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी १९५१ मध्ये जनसंघाची स्थापना केली तेव्हा १९५७ पर्यंत लालकृष्ण अडवाणी पक्षाचे सचिव होते. त्यानंतर १९७३ ते १९७७ पर्यंत त्यांनी जनसंघाचे अध्यक्षपद भूषवले. १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हा ते त्याचे संस्थापक सदस्य होते. अडवाणी १९८० ते १९८६ पर्यंत भाजपचे सरचिटणीस होते. १९८६ ते १९९१ पर्यंत ते भाजपचे अध्यक्ष होते. अडवाणी हे तीन वेळा भाजपचे अध्यक्ष होते. ते ५ वेळा लोकसभेचे आणि ४ वेळा राज्यसभेचे खासदार होते. १९७७ ते १९७९ या काळात ते पहिल्यांदा केंद्रीय मंत्री झाले. या काळात त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला.

लालकृष्ण अडवाणी हे असे नेते आहेत ज्यांनी त्यांच्या रथयात्रेद्वारे अयोध्येत राम मंदिर आंदोलनाची ज्योत पुन्हा प्रज्वलित केली. अडवाणींच्या या पावलामुळेच देशाच्या राजकारणात ‘यात्रे’ची संस्कृती सुरू झाली. लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरातमधील सोमनाथ ते अयोध्येपर्यंत रथयात्रा काढली होती, त्यानंतर देशात हिंदुत्वाच्या राजकारणासारखी विचारसरणी उदयास आली. बिहारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडवाणींना अटक केली होती. त्यानंतर अडवाणींचा राजकारणातील मान आणखी वाढला होता.

१९८० ते १९९० या दरम्यान अडवाणींनी भाजपला राष्ट्रीय पातळीवरील पक्ष बनवण्यासाठी आपले सर्वस्व दिले. याचा परिणाम असा झाला की, १९८४ मध्ये ज्या पक्षाला केवळ २ जागा मिळाल्या होत्या, त्या पक्षाला १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत ८६ जागा मिळाल्या. पक्षाची स्थिती १९९२ मध्ये १२१ आणि १९९६ मध्ये १६१ पर्यंत पोहोचली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेस सत्तेतून बाहेर पडली आणि भाजप सर्वाधिक संख्याबळ असलेला पक्ष म्हणून पुढे आला.

२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करून हुकूमशाही राजवट स्थापन केली. त्यांनी सर्व विरोधी नेत्यांना अटक करून तुरुंगात टाकण्याचे आदेश दिले. त्यांनी आरएसएसवर बंदी घातली. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी बंगळुरूमध्ये होते. तेथून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in