
नवी दिल्ली : एअर इंडियाचे अहमदाबाद-लंडन विमान कोसळल्यानंतर देशाच्या हवाई क्षेत्राचे नियंत्रण करणाऱ्या ‘डीजीसीए’ने मोठ्या विमानतळावरील त्रुटींची झाडाझडती घेण्याचे काम सुरू केले आहे. या झाडाझडतीत विमानतळांवरील अनेक त्रूटी उघड झाल्या आहेत. ‘डीजीसीए’ने अधिकृत निवेदनात सांगितले की, हवाई क्षेत्रातील विविध विभागात अनेक स्तरावर निष्काळजीपणा व देखभाल-दुरुस्तीत त्रुटी आढळल्या. यात उड्डाण संचालन, उड्डाण योग्यता, रॅम्प सुरक्षा, हवाई नियंत्रण कक्ष, संचार, दिशादर्शन, टेहळणी प्रणाली व उड्डाणापूर्वीच्या तपासणीचा समावेश आहे.
अनेक विमानतळाच्या धावपट्टीवरील रेखांकन अस्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे विमान उड्डाण व उतरताना अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच ‘रॅपिड टॅक्सी वे’वर एका बाजूच्या हिरव्या लाईट बंद होत्या. ही त्रुटी विमान संचालनात मोठी तांत्रिक त्रुटी समजली जाते. एक देशातंर्गत विमान टायर घासल्याने थांबले होते. या टायरची दुरुस्त केल्यानंतर विमान उड्डाणाला परवानगी दिली. अनेक विमानांमध्ये एक त्रुटी वारंवार आढळली आहे. याचाच अर्थ देखभालीचे काम चांगल्या पद्धतीने होत नाही.
संयुक्त महासंचालकांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांनी दिल्ली आणि मुंबई विमानतळांची रात्री व सकाळी पाहणी केली. या पाहणीचे निष्कर्ष ‘डीजीसीए’ने नोंदवले आहेत. यापूर्वी नोंदवलेल्या त्रुटी पुन्हा-पुन्हा दिसत आहेत. याचाच अर्थ विमान कंपन्यांच्या कामात सुधारणा दिसत नाही.
देखभालीत निष्काळजीपणा नको!
विमान व विमानतळ देखभालीत निष्काळजीपणा नको. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असा इशारा ‘डीजीसीए’ने दिला आहे. या तपासणीनंतर सरकार विमानतळ व विमान कंपन्यांवर कठोरपणे लक्ष ठेवेल. कारण त्यातून अनेक त्रुटी दुरुस्त करता येऊ शकतील.