नऊ वर्षांत ४४७ प्रवासी 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये; विमानात गोंधळ घालणाऱ्यांवर DGCA ची कठोर कारवाई

‘नागरी विमान वाहतूक महासंचालनालया’ने (डीजीसीए) २०१७ मध्ये लागू केलेल्या नियमांनुसार आतापर्यंत तब्बल ४४७ प्रवाशांना ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकून त्यांच्यावर उड्डाणबंदी घालण्यात आल्याची माहिती दिली.
नऊ वर्षांत ४४७ प्रवासी 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये; विमानात गोंधळ घालणाऱ्यांवर DGCA ची कठोर कारवाई
नऊ वर्षांत ४४७ प्रवासी 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये; विमानात गोंधळ घालणाऱ्यांवर DGCA ची कठोर कारवाईप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

धैर्य गजरा/मुंबई :

‘नागरी विमान वाहतूक महासंचालनालया’ने (डीजीसीए) २०१७ मध्ये लागू केलेल्या नियमांनुसार आतापर्यंत तब्बल ४४७ प्रवाशांना ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकून त्यांच्यावर उड्डाणबंदी घालण्यात आल्याची माहिती दिली.

क्वाला लंपूर येथून कोचीकडे जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानात एका प्रवाशाने घातलेल्या धिंगाण्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेनंतर विमानात गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांवरील कठोर कारवाईचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बाटिक एअरच्या ‘ओडी-२३१’ या विमानात हा थरारक प्रकार घडला. विमान हवेत असताना १२-ए या सीटवर बसलेल्या ३६ वर्षीय प्रवाशाने अचानक पायाने मारून आपत्कालीन दरवाजाचे काच पॅनेल तोडले आणि दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न केला. काच तुटल्याने विमानात वेगाने हवा शिरली आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या प्रवाशाने इतर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धमकावण्यास सुरुवात केली. केबिन क्रू आणि काही तत्पर प्रवाशांनी प्रसंगावधान राखून त्याला ‘झिप टाय’ने बांधून ठेवले.

कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान सुरक्षित उतरल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी त्याला ताब्यात घेऊन स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीवर विमानाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी भारतीय नागरी संहिता (बीएनएस) आणि विमान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१७ पासून लागू झालेल्या नियमांनुसार विमानाची काच तोडणे, कर्मचारी व प्रवाशांशी गैरवर्तन करणे अशा प्रकारांमुळे सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने ४४७ जणांवर उड्डाणबंदीची कारवाई करण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक आवश्यकता (सीएआर) विभाग-३ मधील नियमांनुसार विमानातील शिस्त आणि सुरक्षा राखणे बंधनकारक आहे. २०२५ च्या केबिन सुरक्षा परिपत्रकानुसार, प्रवाशांच्या गैरवर्तनाची घटना घडल्यास एअरलाईन्सने १२ तासांच्या आत ई-मेलद्वारे आणि २४ तासांच्या आत ‘डीजीसीए’कडे लेखी अहवाल सादर करणे आवश्यक आहे.

गैरवर्तनाचे तीन टप्पे

  • गैरवर्तनाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत: तोंडी वाद किंवा सूचना न मानणे (स्तर-१) यासाठी ३ महिने बंदी

  • शारीरिक गैरवर्तन किंवा मालमत्तेचे नुकसान (स्तर-२) यासाठी ६ महिने बंदी.

  • आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न किंवा कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला (स्तर-३) या अत्यंत गंभीर गुन्ह्यासाठी २ वर्षांपासून थेट आयुष्यभराची उड्डाणबंदी होऊ शकते.

स्वतंत्र अंतर्गत समितीकडून घटनेचा तपास

कोणत्याही प्रवाशाला ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्यापूर्वी संबंधित एअरलाईनची स्वतंत्र अंतर्गत समिती या घटनेचा तपास करते. केबिन क्रूच्या नोंदी आणि पुराव्यांची तपासणी करून समिती शिफारस करते, ज्यानंतर ‘डीजीसीए’ त्या प्रवाशाचे नाव केंद्रीय यादीत समाविष्ट करते. या बंदीविरोधात प्रवाशाला ६० दिवसांच्या आत उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील अपील समितीकडे दाद मागता येते, तर तेथेही दिलासा न मिळाल्यास उच्च न्यायालयात आव्हान देता येते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in