
नवी दिल्ली : उड्डाण ऑपरेशन्समध्ये अशीच अनियमितता सुरू राहिली तर एअरलाइन्सचा परवाना निलंबित केला जाऊ शकतो किंवा रद्दही केला जाऊ शकतो, असा इशारा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एअर इंडियाला दिला आहे.
पायलट ड्युटी शेड्युलिंग आणि मॉनिटरिंगमध्ये गंभीर उल्लंघन होत असल्यामुळे हा इशारा देण्यात आला आहे. एअर इंडियाने विभागीय उपाध्यक्ष चुडा सिंग, क्रू शेड्युलिंग करणारी मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि क्रू शेड्युलिंग प्लॅनिंगमध्ये सहभागी असलेली पायल अरोरा या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश ‘डीजीसीए’ने दिले होते. या तीन अधिकाऱ्यांविरुद्ध तत्काळ कारवाई करावी आणि एअर इंडियाने १० दिवसांत अहवाल सादर करावा, असे ‘डीजीसीए’च्या आदेशात म्हटले होते.
विमान सुरक्षा प्रोटोकॉलचे गंभीर उल्लंघन केल्याबद्दल तिन्ही अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. या अधिकाऱ्यांविरुद्ध तत्काळ आंतर-शिस्तबद्ध कारवाई सुरू करावी. सुधारात्मक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या अधिकाऱ्यांची नॉन-ऑपरेशनल पोस्टवर बदली करावी आणि त्यांना कोणत्याही उड्डाण सुरक्षा किंवा क्रू अनुपालन संबंधित पदावर काम करण्याची परवानगी देऊ नये. भविष्यात क्रू शेड्युलिंग, परवाना किंवा उड्डाण वेळेशी संबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. ज्यामध्ये दंड, परवाना निलंबन किंवा ऑपरेटर परवानगी रद्द करणे समाविष्ट असू शकते.
२०२४ सालापासून एअर इंडियाने केलेल्या सर्व तपासण्या आणि ऑडिटची माहिती ‘डीजीसीए’ने मागितली आहे. ‘डीजीसीए’ने फ्लाइट ऑपरेशन निरीक्षकांना २२ जूनपर्यंत एअर इंडियाचे तपशील देण्यास सांगितले आहे. हा डेटा नियोजित-अनियोजित तपासणी, ऑडिट, कॉकपिट/मार्ग, स्टेशन सुविधा, रॅम्प आणि केबिन तपासणीबद्दल आहे.
‘डीजीसीए’ने देशातील संपूर्ण विमान वाहतूक व्यवस्थेचे ३६० अंश स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आता एक विशेष 'कॉम्प्रिहेन्सिव्ह स्पेशल ऑडिट' केले जाईल. याअंतर्गत, उड्डाण ऑपरेशन्स, देखभाल, परवाना, सुरक्षा व्यवस्थापन, प्रशिक्षण संस्था, एमआरओ (देखभाल, दुरुस्ती, ओव्हरहॉल), एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोलर) सारख्या संपूर्ण यंत्रणेची तपासणी केली जाईल.
एअर इंडियाच्या विमानाचे रियाधमध्ये इमर्जन्सी लँडिंग
यूकेच्या बर्मिंगहॅम येथून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे सौदी अरेबियातील रियाध येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. एआय-११४ क्रमांकाच्या या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. प्रवाशांना रियाधहून दिल्लीला आणण्यासाठी एअर इंडियाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.