

नवी दिल्ली : भारतात प्रौढांमधील मधुमेहाच्या (डायबिटीज) उपचारांसाठी आठवड्यातून एकदाच घ्यायचे ‘ॲविकली’ हे बेसल इन्सुलिन इंजेक्शन डेन्मार्कच्या ‘नोव्हो नॉर्डिस्क’ने सादर केले आहे. जगात सर्वाधिक म्हणजे दहा कोटी मधुमेही भारतात आहेत.
नोव्हो नॉर्डिस्क इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत श्रोत्रिय यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, कंपनी ‘ॲविकली’ इंजेक्शन ७०० युनिट आणि २,१०० युनिट अशा दोन वेगवेगळ्या पेन प्रकारांमध्ये उपलब्ध करून देत आहे. यात प्रति युनिटची किंमत ३.७३ रुपये असेल. ते म्हणाले, ही एक आधुनिक उपचार पद्धती असून, हे इंजेक्शन सादर करणारा भारत हा जगातील सातवा देश ठरला आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘ॲविकली’ हे ‘टाईप १’ किंवा ‘टाईप २’ मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी इन्सुलिन घेण्याच्या पद्धतीत मोठा बदल घडवून आणेल. यामुळे रोजच्या रोज इंजेक्शन घेण्याच्या कष्टांमधून सुटका होऊन आठवड्यातून एकदाच इंजेक्शन घ्यावे लागेल. परिणामी, वर्षाला ३६५ वेळा घ्याव्या लागणाऱ्या इंजेक्शनची संख्या कमी होऊन ती थेट ५२ वर येईल.
रुग्णांसाठी सोईचे
‘ॲविकली’चे फायदे स्पष्ट करताना श्रोत्रिय म्हणाले की, सध्याच्या सामान्य उपचार पद्धतींमध्ये मधुमेहाच्या रुग्णांना साधारणपणे रोज इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. यामुळे रुग्ण अनेकदा इन्सुलिन घेण्यास नकार देतात, कारण त्यांना वाटते की हे इंजेक्शन दररोज आणि आयुष्यभर घ्यावे लागेल. त्यामुळे आठवड्यातून एकदाच घ्यावे लागणारे त्यांच्यासाठी उपकारक ठरू शकेल.