एकाच रक्त चाचणीत ५० प्रकारच्या कर्करोगांचे निदान ; सामान्य डॉक्टरांकडून होणार चाचणी

एकाच रक्त चाचणीत ५० प्रकारच्या कर्करोगांचे निदान करण्याची पद्धत विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश
एकाच रक्त चाचणीत ५० प्रकारच्या कर्करोगांचे निदान ; सामान्य डॉक्टरांकडून होणार चाचणी
Published on

लंडन : एकाच रक्त चाचणीत ५० प्रकारच्या कर्करोगांचे निदान करण्याची पद्धत विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. ब्रिटनच्या आरोग्य सेवेने घेतलेल्या परीक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे कर्करोगाच्या निदानासाठी विविध प्रकारच्या चाचण्या करण्यातून आणि रुग्णालयांच्या खेपा मारण्यातून रुग्णांची सुटका तर होऊ शकतेच, शिवाय अनेक प्रकारच्या कर्करोगांच्या निदानासाठी विशेष तज्ज्ञ डॉक्टरांवर विसंबून न राहता सामान्य डॉक्टरांकरवी (जनरल प्रॅक्टिशनर) त्याचे निदान केले जाऊ शकते.

गॅलेरी टेस्ट असे या रक्ताच्या चाचणीचे नाव आहे. त्यात कर्करोगग्रस्त पेशींच्या तुटलेल्या गुणसूत्रांचा शोध घेतला जातो आणि त्या आधारे कर्करोगाचे निदान केले जाते. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने या रक्त चाचणीचे परीक्षण करण्यात आले. त्यात सुमारे ५००० रुग्णांचा सहभाग होता. त्यातील दोन तृतीयांश रुग्णांच्या बाबतीत या रक्त चाचणीतून कर्करोगाचे योग्य निदान झाले. अनेक रुग्णांच्या बाबतीत या चाचणीने शरीरात नेमकी कुठून कर्करोगाची सुरुवात झाली, तेही अचूकपणे शोधले. तर कर्करोग झाला नसलेल्या रुग्णांचे ९८ टक्के प्रकरणांत अचूक निदान केले. त्यामुळे त्यांचा पुढील चाचण्यांना सामोरे जाण्याचा त्रास आणि खर्च वाचला. अर्थात, अद्याप ही चाचणी पूर्णपणे दोषमुक्त झालेली नाही. तिच्यावर आणखी संशोधनाची आणि सुधारणेची गरज आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

‘‘या रक्त चाचणीच्या परीक्षणाचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. यापूर्वी विविध प्रकारच्या कर्करोगांचे निदान करणे ही वेळखाऊ आणि खर्चिक बाब होती. आता केवळ एका रक्त चाचणीत साधारण ५० प्रकारच्या कर्करोगांचे निदान आणि तेही सुरुवातीच्या टप्प्यात होऊ शकते. त्याने अनेक रुग्णांना लाभ होऊ शकतो.’’

- प्रा. डॉ. ब्रायन निकोलसन

logo
marathi.freepressjournal.in