भविष्यात काँग्रेसला सत्ता मिळणे कठीण; राजकीय विश्लेषकाच्या पुस्तकातील दावा

देशाची जनता भ्रष्टाचाराऐवजी प्रगती, खोट्या गोष्टीऐवजी सत्य, दहशतवादाऐवजी सुरक्षा, अडथळ्यांऐवजी आपल्या विकासाला निवडते, असा लेखिकेने दावा केला आहे.
भविष्यात काँग्रेसला सत्ता मिळणे कठीण; राजकीय विश्लेषकाच्या पुस्तकातील दावा

मुंबई : एका बाजूला आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर येण्यापासून रोखण्याच्या उद्देशाने विरोधक इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकजूट करीत आहेत, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू करण्याची जोरदार तयारी केली आहे. यामुळे आगामी निवडणुकीत काही चमत्कार होऊन सत्ता मिळण्याच्या काँग्रेसच्या आशेला धुमारे फुटत असतानाच एका पुस्तकातील लेखिकेच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. राजकीय विश्लेषक प्रियम गांधी मोदी यांनी त्यांच्या नवीन पुस्तकात काँग्रेसच्या भविष्याबद्दल खूप काही नकारात्मक लिहिले आहे. ‘व्हॉट इफ देअर वॉज नो काँग्रेस : द अनसेंसर्ड हिस्ट्री ऑफ इंडिपेंडेंट इंडिया’ या नव्या पुस्तकात लेखक मोदी यांनी नजीकच्या भविष्यात काँग्रेसला सत्ता मिळणे खूपच कठीण असल्याचे म्हटले आहे. लेखिकेने काँग्रेस नेते महात्मा गांधी यांनी एकदा काँग्रेसला बरखास्त करा, असे म्हटल्याची आठवण देखील करून दिली आहे.

मागील दशकभरात भारताने आर्थिक आणि सांस्कृतिक पातळ्यांवर ज्या पद्धतीने स्वत:ला बदलले आहे, त्यातून काँग्रेसची सत्ता असलेला भारत केव्हाच गायब झाला आहे. आजघडीस काँग्रेसच्या अस्तित्वावरच संकट आले असून आता काँग्रेसची सत्ता परत येणे कठीण असल्याचे लेखिका प्रियम गांधी मोदी यांनी म्हटले आहे. काँग्रेसला त्यांचे विरोधी पक्षनेतेपदही मिळण्याची शक्यता धूसर आहे. गेली ८० वर्षे बहुतांशी काँग्रेसचे राज्य होते. परंतु, या वर्षात काँग्रेस सत्तेत नसती तर देशाचे भविष्य निश्चितच वेगळे असते, असे लेखिकेचे म्हणणे आहे. रूपा पब्लिकेशनद्वार प्रकाशित या पुस्तकात गेल्या ८० वर्षांतील भारतावर परिणाम करणाऱ्या घटनांचा मागोवा घेतला आहे. त्यात फाळणी, काश्मीर, प्रशासन, घोटाळे, लोकशाही आणि त्यातून आलेली संकटे, आर्थिक नीती, बौद्धिक स्थलांतरण, विदेशी गुंतवणूक आणि परराष्ट्र धोरणावर लेखिकेने आपली मते मांडली आहेत.

लोकांना विकास हवाय

देशाची जनता भ्रष्टाचाराऐवजी प्रगती, खोट्या गोष्टीऐवजी सत्य, दहशतवादाऐवजी सुरक्षा, अडथळ्यांऐवजी आपल्या विकासाला निवडते, असा लेखिकेने दावा केला आहे. येत्या वर्षात काँग्रेसचे सत्तेत पुन्हा येणे अशक्य नसले तरी कठीण मात्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या २०२२ च्या फेब्रुवारीच्या हिवाळी अधिवेशनात एक प्रश्न विचारला होता की, जर देशात काँग्रेस नसती तर काय झाले असते. तेव्हा भारताच्या बुद्धिजीवी वर्ग, इतिहासकार आणि सोशल मीडियावरील फौजेला या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे बनले. यातील काहींनी त्यांच्या विचारांचे समर्थन केले, तर काहींनी विरोध केला.

logo
marathi.freepressjournal.in