नवी दिल्ली : सध्या युद्ध अत्यंत आधुनिक झाली आहेत. हवाई दलासोबतच क्षेपणास्त्रांचा मुबलक वापर सध्याच्या युद्धात केला जातो. काही देशांनी आपले अंतराळ सैन्य तयार केली आहेत. त्यामुळे प्रत्येक देशाला अंतराळातून हल्ल्याची भीती आहे. या अंतराळातून येणाऱ्या क्षेपणास्त्रांचे ट्रॅकिंग ‘दिगंतारा’ हे स्टार्टअप करणार आहे.
‘दिगंतारा’ हे सध्या अंतराळातील कचऱ्याचे निरीक्षण करते. या क्षेत्रात त्यांनी विशेष कौशल्य मिळवले आहे. आता उपग्रहांच्या मदतीने क्षेपणास्त्रांचे ट्रॅकिंग करण्याच्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला आहे. जगभरातील सरकारांकडून वाढत्या मागणीमुळे कंपनी आता नवीन क्षेत्रात पदार्पण करत आहे.
कंपन्या उच्च-गती इंटरनेट आणि पृथ्वी निरीक्षणासाठी ‘लो-अर्थ ऑर्बिट’मध्ये मोठ्या प्रमाणावर उपग्रह प्रक्षेपित करत असल्याने अवकाशकचरा आणि वाहतूक निरीक्षण हे जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचे क्षेत्र बनले आहे.
‘आम्ही अत्यंत वेगाने हालचाल करणाऱ्या अवकाशातील वस्तूंचे निरीक्षण करत होतो. त्या अनुभवातून आणि त्यातून शिकलेल्या धड्यांच्या आधारे, त्याच आर्किटेक्चरचा वापर करून आम्ही अंतराळातून क्षेपणास्त्र ट्रॅकिंग आणि डिटेक्शनवर काम करणार आहोत,’ असे ‘दिगंतारा’ इंडस्ट्रीजचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध शर्मा यांनी सांगितले.
कंपनीची एकात्मिक पायाभूत रचना प्रगत हार्डवेअर, डेटा आणि प्रक्रिया क्षमतांना एकत्र आणते, ज्यामुळे अवकाश आणि जमिनीवरील प्रणालींना बहुविभागीय निरीक्षणाची क्षमता प्राप्त होते. या अवकाश व जमीन संरचनेत विविध प्रणालींच्या एकत्रीकरणामुळे उदयोन्मुख धोक्यांचे जवळपास रिअल-टाइम अधिग्रहण, विश्लेषण आणि व्याख्या शक्य होते.
बेंगळुरूस्थित या स्टार्टअपने अमेरिकेत कामकाज सुरू केले आहे, जिथे १०० किलो वर्गातील मोठे उपग्रह आणि अवकाशयान अमेरिकन संरक्षणाच्या गरजा विशेषतः क्षेपणास्त्र निरीक्षण—ध्यानात घेऊन विकसित केले जात आहेत. आता क्षेपणास्त्रांशी संबंधित बाबी सिंगापूर, थायलंड आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या छोट्या बाजारांनाही सेवा देतात. परंतु, अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून ऑर्डर्स मिळवण्यासाठी अमेरिकेत समर्पित कार्यालय आणि टीम आवश्यक आहे,” असे सांगत शर्मा यांनी कोलोरॅडो स्प्रिंग्समध्ये कार्यालय सुरू करण्याची गरज अधोरेखित केली.
गेल्या आठवड्यात ‘दिगंतारा’ने आपल्या नव्या प्रकल्पांसाठी ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर निधी उभारल्याची घोषणा केली.
‘दिगंतारा’ २०२६-२७ मध्ये दोन ‘अल्बाट्रॉस’ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. जे प्रारंभिक क्षेपणास्त्र इशारा प्रणाली आणि अचूक ट्रॅकिंगसाठी समर्पित असतील. याशिवाय ‘स्कायगेट’ ऑपरेशन्सच्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण निरीक्षणासाठी जमिनीवरील सेन्सर नेटवर्क याचाही विस्तार करण्यात येणार आहे.
१५ उपग्रह सोडणार
कंपनी ‘स्कॉट’ नावाचा एक व्यावसायिक अंतराळ-निरीक्षण उपग्रह चालवते. जो जानेवारी २०२५ मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता. २०२६-२७ मध्ये आणखी १५ उपग्रह प्रक्षेपित करण्याची कंपनीची योजना आहे, ज्यामुळे तिची अवकाश निरीक्षण क्षमता अधिक वाढेल.