

उज्जैन : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी १२.५ कोटी भक्तांकडून घेतलेल्या देणग्यांचा हिशोब कुठे आहे, असा सवाल काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. तसेच मंदिर देणगीत कथित आर्थिक अनियमिततेच्या संदर्भात, 'श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट'चे सरचिटणीस चंपत राय यांना अटक करण्याची मागणीही त्यांनी केली.
सिंह यांनी आरोप केला की, 'या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेची आहे. परंतु ते आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. जे लोक धर्म, सनातन धर्म आणि प्रभू रामावर विश्वास ठेवतात, ते ही चोरी आणि लूट खपवून घेणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मंदिरातील देणगी घोटाळा उघडपणे झाला आहे. महिपाल सिंह आणि दीनानाथ वर्मांसारखे साक्षीदार उपलब्ध आहेत. मग तुम्ही त्यांचे पुरावे का घेत नाही? त्यांचे जबाब का नोंदवत नाही?, असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, दिग्विजय सिंह म्हणाले की, काँग्रेस राम मंदिर देणगीचा मुद्दा प्रत्येक गावात उपस्थित करेल आणि त्यासाठी वॉर्डपासून जिल्हा स्तरापर्यंत समित्या स्थापन केल्या जात आहेत. भाजप, विहिंप आणि संघाने एकत्रितपणे सनातन धर्माच्या परंपरा नष्ट केल्या असून अनुयायांचा विश्वासघात केला आहे. विहिंप आणि संघाचा धर्म किंवा धार्मिक व्यवस्थेशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
चंपत राय, अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब
लखनौ : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताला शनिवारी ट्रस्टने दुजोरा दिला. तसेच, राम मंदिर देणगीशी संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी केली जाईल, अशी ग्वाही ट्रस्टने दिली आहे. ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी म्हटले की, ट्रस्टला हे दोन राजीनामे प्राप्त झाले असून, पुढील बैठकीत त्याबाबत निर्णय घेतला जाईल.