शेतकरी आंदोलन 2.0 : पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा; लाल किल्ल्यासह अनेक मेट्रो स्थानकांना टाळं; आंदोलन चिघळण्याची भीती

शंभू सीमेवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचंही वृत्त असून आंदोलन चिघळण्याची भीती व्यक्त होत आहे.
शेतकरी आंदोलन 2.0 : पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा; लाल किल्ल्यासह अनेक मेट्रो स्थानकांना टाळं; आंदोलन चिघळण्याची भीती
(पीटीआय फोटो)

शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये चंदीगड येथे सोमवारी मध्यरात्रीपर्यंत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर हजारो शेतकऱ्यांनी आज दिल्लीकडे मोर्चा वळवला आहे. शेतकरी हरियाणातील शंभू सीमेवर पोहोचले असून मोठ्या प्रमाणात तैनात असलेल्या हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचंही वृत्त असून आंदोलन चिघळण्याची भीती व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चामुळे दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय राजधानीत एका महिन्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लागू केले आहे. दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तीन प्रमुख सीमांवर लोखंडी आणि काँक्रीट बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. काटेरी तारा, कंटेनर, डंपर लावून रस्तेही बंद करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील दोन मेट्रो स्थानकेही बंद करण्यात आले आहेत. तसेच दिल्ली-नोएडाच्या सीमावर्ती भागातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

कलम १४४ लागू झाल्यामुळे दिल्लीत सभा, मिरवणूक किंवा रॅली आयोजित करण्यावर आणि नागरिकांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या प्रवेशावर पूर्ण बंदी असेल. शेतकरी आंदोलनाबाबत गुरुग्राम प्रशासनही सतर्क झाल्याचे पाहायला मिळाले. हरियाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन पाहता कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. गुरुग्रामच्या जिल्हा प्रशासनाकडूनही दक्षता घेण्यात येत आहे.

पंजाब (किसान मजदूर संघर्ष कमेटी) केएमएससीचे अध्यक्ष सुखविंदर सिंग सभारा यांनी सांगितले की, आज २०० शेतकरी संघटना दिल्लीकडे कूच करतील. अपूर्ण राहिलेले आंदोलन पूर्ण करण्यासाठी ९ राज्यांतील शेतकरी संघटना संपर्कात आहेत. पुद्दुचेरी, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरयाणा, राजस्थान आणि पंजाब ही सर्व राज्ये आंदोलनासाठी सज्ज आहेत. मात्र दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, कोणत्याही प्रकारची रॅली किंवा मिरवणूक काढण्यावर आणि रस्ते रोखण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश १२ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत लागू असेल. दिल्ली पोलिसांच्या आदेशानुसार, ट्रॅक्टर रॅलींना राष्ट्रीय राजधानीच्या सीमा ओलांडण्यास बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ट्राफिक ॲडव्हायजरी जारी केला आहे. पण, थोड्याच वेळात शेतकरी दाखल झाल्यानंतर येथील परिस्थिती अजून तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in