विमानतळांवरील लाऊंजमध्ये आता मिळणार थेट प्रवेश; भारतीय क्रेडिट कार्डधारकांसाठी मोठी घोषणा

भारतीय बँकांचे क्रेडिट कार्ड असलेल्या प्रवाशांना आता अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) संचलित देशभरातील विमानतळांवरील लाऊंजमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. या उपक्रमामुळे आता प्रवाशांना मध्यस्थ प्लॅटफॉर्मवर नोंदणी करण्याची गरज राहणार नाही. याचे कारण म्हणजे बँका आता थेट विमानतळ ऑपरेटरसोबत भागीदारी करत आहेत.
विमानतळांवरील लाऊंजमध्ये आता मिळणार थेट प्रवेश; भारतीय क्रेडिट कार्डधारकांसाठी मोठी घोषणा
Published on

धैर्य गजारा / मुंबई

भारतीय बँकांचे क्रेडिट कार्ड असलेल्या प्रवाशांना आता अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) संचलित देशभरातील विमानतळांवरील लाऊंजमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. या उपक्रमामुळे आता प्रवाशांना मध्यस्थ प्लॅटफॉर्मवर नोंदणी करण्याची गरज राहणार नाही. याचे कारण म्हणजे बँका आता थेट विमानतळ ऑपरेटरसोबत भागीदारी करत आहेत.

आतापर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील लाऊंजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रवाशांना आपले क्रेडिट कार्ड्स विविध मध्यस्थ प्लॅटफॉर्मवर नोंदवावे लागत होते. जेणेकरून मुख्य टर्मिनलमधील आराम आणि सुविधा मिळू शकतील. मात्र आता AAHL ने मध्यस्थांची भूमिका रद्द केली असून प्रवाशांना लाऊंजमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. हे त्यांच्या लाऊंज ऑपरेटर भागीदारांमार्फत शक्य होणार आहे.

देशभरातील AAHL-विनियोजित विमानतळांवर १७ लाऊंज आहेत, जिथे प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रवाशांना प्रवेश मिळत असे. मात्र, गुरुवारी एएएचएलचे सीईओ अरुण बन्सल यांनी लिंक्डइन पोस्टद्वारे जाहीर केले की, आता भारतभरातील प्रवाशांना कोणत्याही मध्यस्थांशिवाय सहज लाऊंजमध्ये प्रवेश करता येईल. हा कार्यक्रम अदानी डिजिटल लॅबतर्फे राबवण्यात येत असून, सर्व एएएचएल विनियोजित विमानतळांवरील लाऊंजमध्ये लागू होणार आहे.

सध्या ही सेवा केवळ भारतीय बँकांच्या ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे. ICICI बँक आणि Axis बँक आधीच या नव्या व्यवस्थेत सहभागी झाल्या असून इतर बँका संक्रमणाच्या प्रक्रियेत आहेत.

प्रवक्त्यांनी स्पष्ट केले की, "भारतीय बँकांसाठी मध्यस्थांची गरज आता उरलेली नाही, कारण बँका थेट एएएचएलसोबत भागीदारी करत आहेत, जेणेकरून त्यांच्या ग्राहकांना अधिक चांगली सेवा व अनुभव मिळू शकेल."

कार्डधारकांना दोन प्रकारे लाऊंज प्रवेश मिळेल

  • १. EDC मशीनवर कार्ड स्वाइप करून किंवा

  • २. QR कोड प्रक्रियेद्वारे प्री-बुकिंग करून.

फिनटेक क्रांतीमुळे मध्यस्थांची गरज दूर

एएएचएलचे सीईओ अरुण बन्सल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, "या फिनटेक क्रांतीमुळे मध्यस्थांची गरज अनेक क्षेत्रांतून दूर झाली आहे, अगदी Airbnb आणि Uber यांच्याप्रमाणे. आम्ही आता हीच नावीन्यपूर्ण भावना आमच्या परिसंस्थेत आणली आहे, जी आमच्या उत्कृष्ट डिजिटल लॅब टीमने विकसित केली आहे. भारतभरातील प्रवाशांना आता आमच्या प्लॅटफॉर्मवरून भागीदार लाऊंज ऑपरेटरांच्या माध्यमातून थेट लाऊंजमध्ये प्रवेश मिळेल."

logo
marathi.freepressjournal.in