मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने प्रसिद्ध उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांच्या मुंबईच्या मुख्य कार्यालयासह अन्य चार ठिकाणी छापे टाकले आहेत. इडीच्या पथकाने आज गुरुवारी २२ फेब्रुवारीला हिरानंदानी समुहावर कारवाईचा बडगा उगारला आहे. फेमा (FEMA) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी इडीने हिरानंदानी समुहावर कारवाई केलीय. त्यांच्या मुंबईतील मुख्य कार्यालयासह राज्यातील इतर कार्यालयांमध्येही ईडीने छापा टाकला आहे. याबाबत सूत्रांनी पीटीआयला माहिती दिलीय.
परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे नियम मोडल्याचा आरोप ईडीने हिरानंदानी समुहावर केला आहे. तसंच २०२२ मध्येही प्राप्तिकर विभागाने हिरानंदानी समुहाच्या २५ ठिकाणांवर छापे टाकले होते. यामध्ये मुंबई, बंगळुरु आणि चेन्नई येथील कार्यालयांचाही समावेश आहे. कर चुकवल्याच्या संशयास्पद प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती.
तसंच तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांचा समावेश असलेल्या रोख रक्कम प्रकरणात निरंजन हिरानंदानी यांचा मुलगा दर्शन हिरानंदानी याला अटकल करण्यात आली होती. परंतु, ही कारवाई मोईत्रा प्रकरणातील असल्याचं बोललं जातंय. याबाबत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली होती.मोईत्रा यांनी संसदेत अदाणी ग्रुप आणि पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी प्रश्न विचारले होते. यासाठी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून त्यांना महागडे गिफ्ट्स देण्यात आल्याचा आरोपही मोईत्रा यांच्यावर करण्यात आला होता.