पाटणा : जेडीयूचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे मागील काही दिवसांपासून देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. कारण नितीश कुमार हे पुन्हा एकदा विरोधकांच्या इंडिया आघाडीला धक्का देत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएसोबत जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशातच नितीश कुमार यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसकडून त्यांना इंडिया आघाडीत महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल, असे समजते. नितीश कुमार यांची इंडिया आघाडीच्या निमंत्रकपदी नियुक्ती होऊ शकते.
देशभरातील विरोधी पक्षांना एका मंचावर आणण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर विरोधकांच्या या आघाडीत आपल्याला महत्त्वाची भूमिका मिळेल, अशी सुरुवातीपासून नितीश कुमार यांची अपेक्षा होती. मात्र इंडिया आघाडीच्या मागील तीन बैठकांत त्यांना फारसे महत्त्व दिले गेले नाही. यामुळे नाराज झाले होते. ललन सिंह यांनी नुकताच जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर नितीश कुमार हे जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. जेडीयू पुन्हा एनडीएमध्ये सामील होणार असल्यामुळेच नितीश कुमार यांनी पक्षाची पकड घट्ट केल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात लावला जात आहे.
नितीश कुमार यांनी मांडलेल्या इतर भूमिकांनाही काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे बोलले गेले आहे. त्यामुळे नाराज झालेले नितीश कुमार पुन्हा एकदा वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या मनस्थितीत असल्याच्या चर्चांनी वेग पकडला होता. मात्र नितीश कुमार यांचे इंडिया आघाडीतून बाहेर पडणे, सध्याच्या स्थितीत काँग्रेसला परवडणारे नाही. त्यामुळेच काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोलसाठी नितीश कुमार यांना अपेक्षित असणारा निर्णय घेतला जाईल, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून जेडीयूच्या काही खासदार आणि इतर नेत्यांनी काँग्रेसवर उघड टीका करण्यास सुरुवात केली होती. तसेच नितीश कुमार यांच्या कार्यालयाबाहेर सूचक पोस्टर्सही लागले होते. बिहारनंतर आता देशाचे नेतृत्व करण्यासाठी नितीश कुमार सज्ज असल्याच्या आशयाचे हे पोस्टर्स होते. त्यामुळे नितीश कुमार यांची इंडिया आघाडीचा चेहरा होण्याची महत्त्वाकांक्षा आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत होता. दरम्यान, नितीश कुमारांची कथित नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसकडून खरेच त्यांना इंडिया आघाडीचे निमंत्रकपद दिले जाते की नुसतेच झुलवण्यात येते, हे आगामी काळात स्पष्ट होर्इलच.