बांगलादेशी मतदारांत निरुत्साह,दुपारपर्यंत २७ टक्के मतदान : विरोधी पक्षाचा बहिष्कार, किरकोळ हिंसाचार

अंदाजानुसार सुमारे ४० टक्के मतदान झाले होते. परंतु, अंतिम मतमोजणीनंतर आकडा बदलू शकतो, असे मुख्य निवडणूक आयुक्त काझी हबीबुल अवल यांनी सांगितले.
बांगलादेशी मतदारांत निरुत्साह,दुपारपर्यंत २७ टक्के मतदान : विरोधी पक्षाचा बहिष्कार, किरकोळ हिंसाचार

ढाका : बांगलादेशात रविवारी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांचा अनुत्साह दिसला. मतदान संपण्याच्या एक तास अगोदर दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाने २७.१५ टक्के मतदान झाल्याचे सांगितले होते. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ४० टक्के मतदान झाले होते. परंतु, अंतिम मतमोजणीनंतर आकडा बदलू शकतो, असे मुख्य निवडणूक आयुक्त काझी हबीबुल अवल यांनी सांगितले. बांगलादेशात २०१८ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ८० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. मतदानादरम्यान देशभरात हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या.

मतदान सुरू होताच पंतप्रधान हसिना यांनी ढाका सिटी कॉलेज मतदान केंद्रावर मतदान केले. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सायमा वाजेदही होती. सध्या तुरुंगात असलेल्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) यंदा लोकांना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केल्याने मतदारांची संख्या कमी होती. सध्याच्या सरकारच्या काळात कोणतीही निवडणूक निष्पक्ष आणि विश्वासार्ह नसल्याचा आरोप पक्षाने केला आहे. त्यामुळे पंतप्रधान शेख हसीना सलग चौथ्यांदा विजयी होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या दिवसाचा नेहमीचा उत्साह कुठेच दिसत नव्हता. निवडणूक प्रचार केंद्रांसमोरही सत्ताधारी पक्षाचे समर्थक व निवडणूक प्रतिनिधी वगळता मतदारांची उपस्थिती नव्हती. दुपारी ४ वाजता मतदान संपले आणि मतमोजणी सुरू झाली. निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सोमवारी पहाटेपर्यंत निकाल अपेक्षित आहेत.

हिंसाचाराच्या काही तुरळक घटना वगळता ३०० पैकी २९९ मतदारसंघात मतदान बहुतांशी शांततेत पार पडले. एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याने आयोगाने एका जागेवरील मतदान स्थगित केले. मतदानाच्या वेळ संपताना ईशान्य चट्टोग्राममधील सत्ताधारी अवामी लीगच्या नेत्याची उमेदवारी आयोगाने रद्द केली, कारण त्याने एका पोलीस अधिकाऱ्याला शिविगाळ करून धमकावले. नरसिंगडीतील एक आणि नारायणगंजमधील दोन अशा तीन केंद्रांवर मतदान रद्द करण्यात आले. निवडणूक आयोगाने उद्योगमंत्री नुरुल मजीद महमूद हुमायून यांच्या मुलाला नरसिंगडी येथे निवडणूक घोटाळ्याच्या आरोपावरून अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

चट्टोग्राम-१० जागेसाठी उभे असलेल्या दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीत गोळीबार झाला. शांतो बरुआ (२४) आणि जमाल (३५) या दोघांना गोळ्या लागल्याने चट्टोग्राम मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले. जमालपूरच्या शरीशाबारी येथील मतदान केंद्रावर अवामी लीग उमेदवार आणि अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीत दोन जण जखमी झाले. ढाक्यातील हजारीबाग येथील मतदान केंद्राजवळ झालेल्या दोन क्रूड बॉम्बच्या स्फोटात एका लहान मुलासह चार जण जखमी झाले.

१५०० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार रविवारी झालेल्या मतदानात एकूण ११९.६ दशलक्ष नोंदणीकृत मतदार ४२ हजारहून अधिक मतदान केंद्रांवर मतदान करण्यास पात्र होते. या निवडणुकीत ४३६ अपक्ष उमेदवारांशिवाय २७ राजकीय पक्षांचे १५०० हून अधिक उमेदवार निवडणूक लढवत होते. कडेकोट बंदोबस्तात पार पडलेल्या १२व्या सार्वत्रिक निवडणुकीचे निरीक्षण भारतातील तीन जणांसह शंभरहून अधिक परदेशी निरीक्षकांनी केले. मतदानादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दलांचे ७.५ लाखांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in