
नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहात घटनेवर चर्चा घेण्याची मागणी मंगळवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली. देशात अलीकडे ज्या घडामोडी घडल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर घटनेवर संसदेत चर्चा होणे गरजेचे आहे, असे या नेत्यांनी म्हटले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि आपण दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षांना याबाबत पत्र लिहिले असल्याचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दोन दिवस घटनेवर चर्चा घेण्याची विनंती केल्याचे खर्गे म्हणाले.
या चर्चेसाठी वेळेचे वाटप करावे म्हणजे घटनेबाबतच्या चांगल्या बाबींवर चर्चा करता येऊ शकेल, त्याचप्रमाणे अलीकडे ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्यावरही चर्चा करता येऊ शकेल, अशी मागणी केल्याचे खर्गे म्हणाले. याबाबत सरकारकडून प्रतिसाद मिळण्याची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यावेळी म्हणाले की, घटनेच्या उद्देशिकेची (प्रस्तावना) तंतोतंत अंमलबजावणी केली जात आहे का? जनतेला न्याय, स्वातंत्र्य मिळत आहे का? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? बंधुभाव कोठे आहे? केवळ घटनेसमोर मान तुकविल्याने त्याचे पालन होत नाही, असे ते म्हणाले.
‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या भाजपच्या घोषणेचा उल्लेख करून दिग्विजय सिंह म्हणाले की, प्रत्येक समाजातील प्रत्येक नागरिकाच्या मनात विश्वास निर्माण होईल तेव्हाच हे शक्य आहे.