गुजरात दंगल प्रकरणात बडतर्फ आयपीएस अधिकाऱ्याला अटक

या प्रकरणानंतर गुजरात दंगल प्रकरणात भट्ट यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
गुजरात दंगल प्रकरणात बडतर्फ आयपीएस अधिकाऱ्याला अटक

गुजरात दंगल प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मागील काही दिवसांमध्ये अटकसत्र सुरू आहे. याचदरम्यान मंगळवारी रात्री उशीरा अहमदाबाद पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करुन तीन लोकांना अटक केली आहे. यामध्ये मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि माजी पोलीस महासंचालक आर. बी. श्रीकुमार यांच्यानंतर आता अहमदाबाद पोलिसांनी बडतर्फ आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना अटक केली आहे.मागील बऱ्याच काळापासून पालनपूर तुरुंगामध्ये अटकेत असणाऱ्या भट्ट यांना अहमदाबाद पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतले.

पालनपूर तुरुंगामध्ये संजीव भट्ट यांना ताब्यात घेण्यासंदर्भातील कागदोपत्री पूर्ततेनंतर अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेची तुकडी त्यांना अहमदाबादमध्ये घेऊन गेली. अटकेत असताना एका गुन्हेगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी भट्ट यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली असून याच प्रकरणामध्ये ते तुरुंगात आहेत.

आता या प्रकरणानंतर गुजरात दंगल प्रकरणात भट्ट यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. ट्रान्स्फर वॉरंटअंतर्गत ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगल प्रकरणामध्ये निर्दोष लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ही अटक झाल्याचे सांगण्यात आले.

अटकेची पार्श्वभूमी

गोध्रा जळीतकांडानंतर २००२ मध्ये गुजरातमध्ये दंगल उसळली होती. त्यात अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीतील काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांच्यासह एकूण ६९ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पंतप्रधान मोदी तसेच आणखी ६३ जणांना एसआयटीने (विशेष तपास पथक) क्लीनचिट दिली होती.

२००२मधील गुजरात दंगल हे मोठे षड्यंत्र असून त्यासंदर्भात पुन्हा चौकशी व्हावी, अशी याचिका अहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी न्यायालयात दाखल केली होती.

या याचिकेत तिस्ता सेटलवाड सहयाचिकाकर्त्या आहेत. झाकिया जाफरी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली असून एसआयटीचा अहवाल कायम ठेवला आहे. न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल्या क्लीनचिटनंतर आता गुजरात एसआयटीने तिस्ता सेटलवाड यांना मुंबईत त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सेटलवाड यांचे नाव घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, असे मानले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in