
भाजप कार्यालयात सुरक्षा रक्षक आम्हाला नेमायचे झाल्यास अग्निवीरांना प्राधान्य देतील, असे भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूरमध्ये म्हटले आहे. त्यावरून आता नवीन वाद सुरू झाला आहे.
विजयवर्गीय यांचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेससह देशातील अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून देशातील तरुण आणि लष्कराच्या जवानांचा इतका अनादर करू नका, असे म्हटले आहे. आपल्या देशातील तरुण रात्रंदिवस परिश्रम करून शारीरिक परीक्षा उत्तीर्ण होतात. कारण, त्यांना सैन्यात भरती होऊन आयुष्यभर देशसेवा करायची आहे, भाजप कार्यालयाबाहेर पहारेकरी व्हायचे आहे म्हणून नाही.
विजयवर्गीय मीडियाशी संवाद साधण्यासाठी इंदूरमधील भाजप कार्यालयात पोहोचले. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सर्वप्रथम अग्निपथ योजनेचे फायदे सांगितले. तसेच त्याच्यावर अग्निवीरचा शिक्काही लागलेला असेल. भाजप कार्यालयात सुरक्षा ठेवली तर येथेही अग्निवीरांना प्राधान्य देऊ, असे त्यांनी म्हटले.