द्रमुक तामिळनाडूचा शत्रू, पंतप्रधानांची जोरदार टीका; केरळमधील काँग्रेस आघाडी, यूडीएफ आणि एलडीएफ सरकारवरही निशाणा

द्रविड मुन्नेत्र कळघमवर जोरदार टीका करीत द्रविडी पक्ष हा तामिळनाडूच्या भविष्याचा आणि संस्कृतीचा शत्रू असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केला.
द्रमुक तामिळनाडूचा शत्रू, पंतप्रधानांची 
जोरदार टीका; केरळमधील काँग्रेस आघाडी, यूडीएफ आणि एलडीएफ सरकारवरही निशाणा
Published on

कन्याकुमारी : द्रविड मुन्नेत्र कळघमवर जोरदार टीका करीत द्रविडी पक्ष हा तामिळनाडूच्या भविष्याचा आणि संस्कृतीचा शत्रू असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केला. कन्याकुमारी येथील सभेत ते बोलत होते.

मोदी म्हणाले की, द्रमुकमध्ये देश, तिची संस्कृती आणि वारसा यांच्याबद्दल द्वेष आहे. द्रमुक हा तामिळनाडूच्या भविष्याचा आणि संस्कृतीचा शत्रू आहे. अयोध्या राम मंदिराच्या 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्यापूर्वी मी तामिळनाडूत आलो आणि राज्यातील प्रमुख मंदिरांना भेट दिली. त्यांना तामिळ संस्कृती नष्ट करायची आहे.

यावेळी तामिळनाडूमध्ये भाजपची कामगिरी द्रमुक-काँग्रेस इंडिया आघाडीचा अहंकार मोडून काढेल, असेही पंतप्रधानांनी सांगितले. लोकांना दाखवण्यासाठी भाजपकडे विकास उपक्रम आहेत. विरोधी गटाची घोटाळ्यांची यादी मोठी आहे. द्रमुक आणि काँग्रेस महिलाविरोधी असून त्यांनी केवळ महिलांना मूर्ख बनवले आणि त्यांचा अपमान केला, असा आरोप त्यांनी केला.

मोदी म्हणाले की, केंद्र सरकार कन्याकुमारी जिल्ह्यासाठी अनेक उपक्रम "फास्ट ट्रॅकिंग" करत आहे. द्रमुक-काँग्रेसची इंडिया आघाडी तामिळनाडूला कधीही विकसित राज्य बनवू शकत नाही कारण त्याचा इतिहास घोटाळे आणि भ्रष्टाचाराचा आहे. आज भारताच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावरून कन्याकुमारीमध्ये उठलेली लाट दूरदूरपर्यंत पोहोचेल. १९९१ मध्ये मी कन्याकुमारी ते काश्मीर अशी 'एकता यात्रा' सुरू केली. यावेळी मी काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास केला. जम्मू-काश्मीरच्या जनतेने भारताचे विभाजन करू इच्छिणाऱ्या लोकांना नाकारले आहे. मला खात्री आहे की तामिळनाडूचे लोकांनी सुद्धा तेच करतील, असेही पंतप्रधान मोदी यांनी विश्वासाने सांगितले.

केरळमधील काँग्रेस आघाडी, यूडीएफ आणि एलडीएफ सरकारवर मोदींनी साधला निशाणा

पत्तनमतिट्टा : केरळमधील कम्युनिस्ट पक्षांची युती असलेल्या काँग्रेस आघाडी, यूडीएफ आणि एलडीएफवर पंतप्रधान मोदींनी जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, केरळमधील जनता या दोन आघाड्यांच्या सलग भ्रष्ट आणि अकार्यक्षम सरकारमुळे त्रस्त असल्याचा आरोप त्यांनी केला.

शुक्रवारी पत्तनमतिट्टा या दक्षिण जिल्ह्यात लक्षणीय उपस्थिती असलेल्या ख्रिश्चन समुदायाशी संपर्क साधला आणि अनिल के. अँटोनी (काँग्रेसचे दिग्गज आणि माजी केंद्रीय मंत्री ए. के. अँटोनी यांचे पुत्र) यांना त्यांनी तरुणांचे प्रतीक म्हणून संबोधले. केरळच्या राजकारणात या प्रकारचा ताजेपणा आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अनिल अँटोनी यांनी गेल्या वर्षी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि पत्तनमतिट्टा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. येथे रालोआ कार्यकर्ते आणि अनुयायांच्या मोठ्या मेळाव्यात पंतप्रधान बोलत होते.

ते म्हणाले, "गेल्या निवडणुकीत केरळच्या जनतेने आम्हाला दुहेरी आकडी मतांची टक्केवारी देणारा पक्ष बनवला आणि आता केरळमध्ये यावेळी कमळ फुलणार आहे. व्हॅटिकन येथे पोप फ्रान्सिस यांच्यासोबत झालेल्या भेटीचे स्मरण करून मोदींनी ख्रिश्चन समुदायाशी संपर्क साधला, ज्यांची या दक्षिणेकडील जिल्ह्यात लक्षणीय उपस्थिती आहे. गेल्या महिन्यात कोट्टायम जिल्ह्यातील पुंजार येथे एका कॅथोलिक धर्मगुरूला वाहनाने धडक दिल्याच्या घटनेच्या संदर्भात मोदी म्हणाले, केरळमधील चर्चचे धर्मगुरूही हिंसाचारापासून सुरक्षित नाहीत हे दुर्दैवी आहे. एलडीएफ आणि यूडीएफ या दोन्ही पक्षांची विचारसरणी व विचारधारा आता कालबाह्य आहेत. केरळच्या लोकांच्या पुरोगामी आणि पुढारलेल्या विचारसरणीच्या अगदी विरुद्ध आहेत, असा दावाही पंतप्रधानांनी केला. या सरकारांनी रबर उत्पादकांच्या संघर्षाकडे डोळेझाक केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in