बलात्कार व हत्येच्या विरोधात देशातील निवासी डॉक्टरांचा संप; रुग्णसेवा खंडित

पीडित महिला डॉक्टरला न्याय मिळण्यासाठी निवासी डॉक्टरांनी देशभरात ठिकठिकाणी जोरदार आंदोलन केले.
Doctors Strike
बलात्कार व हत्येच्या विरोधात देशातील निवासी डॉक्टरांचा संप
Published on

नई दिल्ली : कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या हत्येविरोधात देशभरातील डॉक्टरांनी सोमवारी संप पुकारून आक्रोश व्यक्त केला. डॉक्टरांनी आपली नियमित सेवा बंद केली, मात्र आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आली. पीडित महिला डॉक्टरला न्याय मिळण्यासाठी निवासी डॉक्टरांनी देशभरात ठिकठिकाणी जोरदार आंदोलन केले.

‘सेंट्रल प्रोटेक्शन ॲॅक्ट’ लागू करावा, तसेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणीही डॉक्टरांनी केली. राजधानी दिल्लीतील १० सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांनी सोमवारी बेमुदत संप सुरू केला. निवासी डॉक्टर असोसिएशनच्या माहितीनुसार, मौलाना आझाद मेडिकल कॉलेज, राम मनोहर लोहिया रुग्णालय, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, व्हीएमएमसी आणि सफदरजंग रुग्णालय, दीनदयाल उपाध्याय रुग्णालय, जीटीबी, इहबास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकल कॉलेज आणि राष्ट्रीय क्षय आणि श्वसन रोग संस्थेच्या डॉक्टरांनी संपात सहभाग घेतला व ओपीडी, ऑपरेशन थिएटर आणि वॉर्डमधील ड्युटी बंद केली.

‘एम्स’मध्ये संप, मेणबत्ती मोर्चा

देशातील सर्वात मोठे रुग्णालय ‘दिल्ली एम्स’मधील डॉक्टरही संपात सहभागी झाले होते. निवासी डॉक्टर असोसिएशनतर्फे ‘एम्स’ रुग्णालयात मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. यात ‘एम्स’मधील अनेक महिला व पुरुष डॉक्टर्स सहभागी झाले.

डॉक्टर संपावर, रुग्णांचे हाल

महिला डॉक्टरवर बलात्कार व हत्येमुळे नाराज झालेल्या कर्नाटक व लखनौमधील डॉक्टरांनीही सोमवारी संप पुकारला. डॉक्टर संपावर गेल्याने देशभरात रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. रुग्णांना उपचार मिळताना अनेक अडचणी येत होते.

...तर प्रकरण सीबीआयकडे सोपवणार - ममता बॅनर्जीं

कोलकाताच्या आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ निवासी डॉक्टरच्या हत्या प्रकरणाचा छडा येत्या रविवारपर्यंत पूर्ण न झाल्यास हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येईल, असा दम मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी कोलकाता पोलिसांना भरला आहे.

या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी. या घटनेबाबत मला माहिती मिळाल्यानंतर कोलकाता पोलिसांना याप्रकरणी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. रुग्णालयात नर्स, सुरक्षारक्षक असताना ही घटना घडली कशी? हे मला कळत नाही. रुग्णालयात कोणीतरी होते, असे पोलिसांनी मला सांगितले.

याप्रकरणी जलदगती न्यायालय स्थापित केले जाणार आहे. पोलीस, श्वान पथक, न्यायवैज्ञक पथक व अन्य पथके कामाला लागली आहेत. आरोपीला पकडण्यासाठी तपास सुरू केला आहे. येत्या रविवारपर्यंत या प्रकरणाचा छडा न लागल्यास आम्ही हे प्रकरण सीबीआयकडे सोपवणार आहोत, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in