नवी दिल्ली : न्याय व आरोग्य सेवा कोणत्याही परिस्थितीत थांबवल्या जाऊ शकत नाहीत, असे सांगून सुप्रीम कोर्टाने संपकरी डॉक्टरांना कामावर परतण्याचे आवाहन केले. ‘आम्हीही काम सोडून सुप्रीम कोर्टाच्या बाहेर बसावे का? १३ दिवसांपासून ‘एम्स’चे डॉक्टर कामावर नाहीत. हे योग्य नाही. उपचारासाठी दूरवरून लोक येतात. तुमच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे आदेश आम्ही केंद्र व राज्य सरकारांना दिले आहेत’, असे सरन्यायाधीशांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या आवाहनानंतर गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेला देशव्यापी संप डॉक्टरांनी मागे घेतला.
पश्चिम बंगालमधील निवासी डॉक्टरच्या बलात्कार व हत्या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात गुरुवारी झाली. पीडित महिला डॉक्टरचा मृत्यू अनैसर्गिक कारणाने झाल्याचा गुन्हा कोलकाता पोलिसांनी विलंबाने दाखल करणे ही बाब क्लेशदायक आहे, असे न्यायालयाने सांगितले.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पश्चिम बंगाल बलात्कार व हत्या प्रकरणाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर टिप्पणी केली. या सुनावणीच्या वेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टात सांगितले की, बंगालचे एक नवीन मंत्री सांगत आहेत की, आमच्या नेत्याविरोधात बोलणाऱ्याची बोटे छाटली जातील. यावर वकील कपिल सिब्बल यांनी म्हटले की, असे असेल तर मग विरोधी पक्षाचे नेते गोळ्या झाडण्याची भाषा करत आहेत.
सुनावणी करताना सरन्यायाधीश म्हणाले की, डॉक्टरांनी तातडीने कामावर रूजू व्हावे. मी रुग्णालयाची परिस्थिती जाणतो. माझ्या कुटुंबातील व्यक्ती आजारी असताना मी स्वत: सरकारी रुग्णालयाच्या लादीवर झोपलो आहे. तुम्ही कामावर रूजू झाल्यानंतर तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. राज्य सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करायच्या आहेत. तसेच राज्याचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकासोबत बसून डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत निर्णय घ्यावा. हे काम एका आठवड्यात पूर्ण करावे. तसेच दोन आठवड्यांत त्याची अंमलबजावणी व्हावी, असे सरन्यायाधीश म्हणाले.
असा निष्काळजीपणा ३० वर्षांत पाहिला नाही
सीबीआयने कोर्टात सांगितले की, गुन्हा घडलेल्या ठिकाणी फेरबदल झाले आहेत. त्यावर न्या. जे. बी. पारडीवाला म्हणाले की, कोलकाता पोलिसांची भूमिका संशयास्पद असून असा निष्काळजीपणा ३० वर्षांत मी पाहिला नाही. पीडितेचे शवविच्छेदन ९ ऑगस्टला सायंकाळी ६.१० ते ७.१० दरम्यान झाले, तर रात्री ११.३० वाजता अनैसर्गिक मृत्यू अशी का नोंद केली गेली. नियमानुसार, अनैसर्गिक मृत्यू असल्यास गुन्हा नोंदण्यापूर्वी शवविच्छेदन होत असते. हे कसे काय घडले?, असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला. याप्रकरणी गुन्हा नोंदवणाऱ्या कोलकाता पोलीस अधिकाऱ्यांना पुढील सुनावणीच्या वेळी हजर राहण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.
डॉक्टरांची ३६ तासांची ड्युटी अमानवीय
काही डॉक्टरांची ड्युटी ३६ ते ४८ तासांची असते. हे पूर्णपणे अमानवीय आहे. डॉक्टरांच्या कामाचे तास निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाला निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ सप्टेंबर रोजी होणार असून सीबीआय, पश्चिम बंगाल सरकारला ‘स्थिती’जन्य अहवाल देण्याचे आदेश कोर्टाने दिले. तसेच या प्रकरणातील पक्षकारांनी राजकारण करू नये, असा सल्ला दिला.
संदीप घोष यांची पॉलिग्राफी चाचणी होणार
कोलकाता येथील महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणात सीबीआयने आर. जी. कर कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना गुरुवारी सियालदह न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर न्यायालयाने आता संदीप घोषच्या पॉलिग्राफी चाचणीला मान्यता दिली आहे. याशिवाय चार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची पॉलिग्राफी चाचणीही केली जाणार आहे.
‘मार्ड’ संघटनेची संपातून माघार
मुंबई : निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना, नियमित विद्यावेतन नियमित, निवासी व्यवस्था, वसतिगृह उपलब्ध करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेला दिल्यानंतर अखेर निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. दरम्यान, शुक्रवारी रक्तदान शिबिरात रक्तदान करून हा संप मागे घेणार असल्याचे या दोन्ही संघटनांच्या अध्यक्ष व उपस्थित प्रतिनिधींनी जाहीर केले. राज्यातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची संघटना ‘मार्ड’, तसेच मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील संघटना ‘पालिका- मार्ड’ या संघटनांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ निवासस्थानी गुरुवारी बैठक पार पडली.
बलात्काराचा खटला १५ दिवसांत निकाली काढा - ममतांचे मोदींना पत्र
बलात्कारविरोधात केंद्रीय स्तरावर अधिक कडक कारवाई करावी. बलात्काराचा खटला १५ दिवसांत पूर्ण होऊन आरोपीला शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अलापान बंदोपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत हे पत्र वाचून दाखवले.