“बिस्किटे दिली तो काँग्रेस कार्यकर्ता नसून कुत्र्याचाच मालक”, Viral Video वर राहुल गांधींचे स्पष्टीकरण

"कुत्रा घाबरला होता, म्हणून मालकाला बिस्किटे दिली आणि तुम्ही खाऊ घाला, तुमच्या हातून खाईल असे सांगितले. मालकाने त्याला बिस्किट दिल्यावर त्याने लगेच खालले"
“बिस्किटे दिली तो काँग्रेस कार्यकर्ता नसून कुत्र्याचाच मालक”, Viral Video वर राहुल गांधींचे स्पष्टीकरण

“मी ज्या माणसाला बिस्किटे दिली, तो काँग्रेसचा कार्यकर्ता नव्हता. तो त्या कुत्र्याचाच मालक होता. कुत्रा घाबरला होता, म्हणून मालकाकडे बिस्किटे दिली”, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान झारखंडमध्ये मंगळवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल यांनी भाजपकडून व्हायरल केल्या जाणाऱ्या व्हिडिओवर भाष्य केले.

व्हिडिओवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना, “तो माणूस कुत्र्याला घेऊन माझ्याजवळ आला. कुत्रा घाबरला होता. मी त्याला खाण्यासाठी (बिस्किट) दिले. पण, त्याने खाल्ले नाही. म्हणून मी कुत्र्याच्या मालकाकडे ते बिस्किट दिले आणि तुम्ही खाऊ घाला, तुमच्या हातून खाईल असे सांगितले. मालकाने त्याला बिस्किट दिल्यावर त्याने लगेच खालले”, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, भाजपच्या लोकांना कुत्र्यांचं इतकं 'ऑब्सेशन' कशासाठी आहे? कुत्र्यांनी काय बिघडवलंय? असा उद्विग्न सवालही त्यांनी यावेळी केला.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि भाजपचे नेते अमित मालवीय यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत, राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्याला 'कुत्र्याचे बिस्किट' खायला दिल्याचा दावा केला. त्यावरून काँग्रेससह राहुल गांधींवर जोरदार टीका होत आहे. तथापि, तो कुत्रा राहुल गांधींचा नव्हता, शिवाय ज्याला राहुल यांनी बिस्किट दिले ती व्यक्तीही काँग्रेस कार्यकर्ता नसून त्या कुत्र्याचाच मालक असल्याचे आता समोर आले आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' झारखंडच्या रामगड जिल्ह्यातून सोमवारी चौथ्या दिवशी पुन्हा सुरू झाली. रविवारी जिल्ह्यातील सिद्धू-कान्हू मैदानावर रात्रीचा मुक्काम केल्यानंतर ही यात्रा सोमवारी सकाळी महात्मा गांधी चौकातून पुन्हा निघाली.

logo
marathi.freepressjournal.in