देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात मुलींचाच दबदबा दिसून आला. इशिता किशोरने पहिला, गरिमा लोहियाने दुसरा, उमा हरिथीने तिसरा, तर स्मृती मिश्राने चौथा क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उत्तीर्ण झाल्या. ठाण्याच्या कश्मिरा संखेने राज्यात पहिला क्रमांक पटकावला असून, तिला अखिल भारतीय क्रमवारीत २५ वा क्रमांक मिळाला.
महाराष्ट्रात पहिल्या स्थानावर मुलींनीच बाजी मारली आहे. ठाण्याच्या डॉ. कश्मिरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. देशात तिला २५ वा क्रमांक मिळाला आहे. कश्मिराचा हा तिसरा प्रयत्न होता. डॉ. कश्मिरा ही दंतरोगतज्ज्ञ आहे. स्वत:चा व्यवसाय सांभाळून तिने हे यश मिळवले आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले असून, आयएएस अधिकारी म्हणून देशाची सेवा करणार असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. लहानपणापासून आई-वडिलांनी यूपीएससीसाठी प्रेरणा दिली. सकाळची सुरुवात बाबांच्या, 'उठा, आयएएस ऑफिसर' या वाक्याने व्हायची, असेही तिने सांगितले. आपण जीवनविद्येच्या बालसंस्कार केंद्रात जायचो. सद्गुरू वामनराव पै यांची शिकवण कामी आल्याचे तिने सांगितले. कश्मिराचे बाबा खासगी कंपनीत कामाला आहेत, तर तिची आई नोकरी करते.
या परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार, उत्तीर्ण उमेदवारांना भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस), केंद्रीय सेवा, गट ‘ए’, गट ‘ब’मध्ये नियुक्त केले जाईल.