...तोपर्यंत व्यापार चर्चा नाही! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा इशारा

अमेरिकेने भारतावर लादलेल्या आयात शुल्काबाबत जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही, असा धमकीवजा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा दिला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेने भारतावर लादलेल्या आयात शुल्काबाबत जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही, असा धमकीवजा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा दिला.

ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंच्या आयातीवरील टॅरिफ २५ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. पहिल्या टप्प्यात ७ ऑगस्टपासून २५ टक्के टॅरिफ लागू करण्यात आले, तर दुसऱ्या टप्प्यात २७ ऑगस्टपासून अतिरिक्त २५ टॅरिफ लागू केले जाणार आहे. अमेरिकेचा हा निर्णय एकतर्फी असल्याचे भारताने म्हटले आहे.

रशियाशी व्यापार संबंध असणाऱ्या देशांवर दुहेरी निर्बंध लादण्याचा इशारा ट्रम्प यांनी याआधी दिला होता. इतर देशही रशियाकडून तेल खरेदी करत असताना केवळ भारतालाच का लक्ष्य केले जात आहे, असा प्रश्न त्यांना करण्यात आल्यानंतर भारताबाबत त्यांनी नवीन वक्तव्य केले आहे.

ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, भारतासोबतची द्विपक्षीय व्यापार चर्चा थांबविण्यात आली आहे. ५० टक्के टॅरिफ लागू करण्याच्या घोषणेनंतर भारतासोबत द्विपक्षीय व्यापार वाटाघाटी वाढतील का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, ट्रम्प यांनी टॅरिफवरून त्यांची भूमिका स्पष्ट केली. जोपर्यंत आम्ही तोडगा काढत नाही तोपर्यंत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

भारत-पाक युद्धात आमचा थेट सहभाग

भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले तेव्हा अमेरिका "थेट सहभागी झाली" आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांमध्ये शांतता प्रस्थापित केली, असा दावा अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी केला आहे.

ते म्हणाले, ट्रम्प हे शांततेसाठी कटिबद्ध आहेत. म्हणूनच, आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले तेव्हा थेट सहभागी होऊन हे युद्ध थांबवले. त्यामुळे भारतीय उपखंडात शांतता प्रस्थापित झाली.

भारत जगातील वेगवान अर्थव्यवस्था - गोयल

शेतकरी, उद्योगांनी चिंता करण्याची गरज नाही. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. जगाने भारताच्या कामगिरीची दखल घेतली आहे, असे केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. अमेरिकन सरकारला दुग्ध-कृषी बाजारपेठेत प्रवेश हवा आहे. मात्र, आम्ही आतापर्यंत जे व्यापार करार केले. त्यात आम्ही शेती व दुग्ध क्षेत्र विविध देशांसाठी खुले केले नाही, असे गोयल यांनी सांगितले. भारताने कायमच शेतकऱ्यांच्या हिताची बाब बघितली. त्याबाबत कोणतीही तडजोड केली नाही. भारताने अनेक संकटाचे रूपांतर संधीत केले आहे, असे गोयल म्हणाले.

मोदी-पुतीन यांची दूरध्वनीवरून चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या शुक्रवारी दूरध्वनीवरून चर्चा झाली. पुतीन यांनी मोदी यांच्यासोबत युक्रेनमधील संघर्षावर व द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली. पुतीन यांनी मोदी यांना युक्रेनबाबत ताज्या घटनाक्रमाची माहिती दिली. तर मोदी यांनी रशिया-युक्रेन संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. या नेत्यांनी द्विपक्षीय संबंध व द्विपक्षीय अजेंड्यावरील विषयांबाबत झालेल्या चर्चेच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेतला. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना वर्षाखेर होणाऱ्या भारत-रशिया शिखर परिषदेसाठी भारतात येण्याचे आमंत्रण दिले.

logo
marathi.freepressjournal.in