नवी दिल्ली : भारतरत्न एम. एस. स्वामीनाथन यांची मुलगी मधुरा स्वामीनाथन यांनी दिल्लीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय शेतकरी आपले अन्नदाते असून त्यांना अशाप्रकारे गुन्हेगारांसारखी वागणूक देणे योग्य नाही, असे मधुरा स्वामीनाथन म्हणाल्या आहेत.
एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याबद्दल भारतीय कृषी संशोधन संस्थेने एक समारंभ आयोजित केला होता, या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत असताना मधुरा स्वामीनाथन यांनी शेतकरी आंदोलन रोखऱ्यासाठी केंद्र सरकारकडून केलेल्या उपाययोजनांवर टीका केली. स्वामीनाथन म्हणाल्या, ‘‘पंजाबचे शेतकरी दिल्लीकडे आंदोलनासाठी निघाले आहेत. मी वृत्तपत्रात वाचले की, शेतकऱ्यांसाठी हरियाणामध्ये तुरुंग सज्ज ठेवले आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स उभारण्यात आली आहेत. रस्त्यावर अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. पण, हे सर्व लोक शेतकरी आहेत, गुन्हेगार नाहीत.’’
मधुरा स्वामीनाथन म्हणाल्या, ‘‘मी भारतातील सर्व शास्त्रज्ञांना विनंती करत आहे की, कृपया आपल्या अन्नदात्याबद्दल बोला. आपण त्यांना गुन्हेगारांसारखे वागवू शकत नाही. आपल्याला यातून समाधान शोधावे लागेल, ही माझी विनंती आहे. आपल्याला एम. एस. स्वामीनाथन यांचा सन्मान करायचा असेल तर भविष्यात जी काही धोरणे आपण बनविणार आहोत, त्यात शेतकऱ्यांना बरोबर घ्यावेच लागेल.’’