डॉ. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कार

पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ-२०२४’ हा सर्वोच्च पुरस्कार मंगळवारी जाहीर झाला आहे.
डॉ. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कार
छायाचित्र सौजन्य : www.unep.org
Published on

नवी दिल्ली : पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ-२०२४’ हा सर्वोच्च पुरस्कार मंगळवारी जाहीर झाला आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कामासाठी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांतर्गत ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार देऊन संशोधक आणि अभ्यासकांना सन्मानित करण्यात येते. २००५ पासून या पुरस्काराने आतापर्यंत १२२ संशोधकांना गौरविण्यात आले आहे.

गाडगीळ मागील अनेक दशके संशोधन आणि सामुदायिक सहभागाच्या माध्यमातून लोक आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे काम करत आहेत. डॉ. गाडगीळ यांना यापूर्वी ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ हे भारताचे मानाचे पुरस्कार मिळाले असून, जगातील अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. वयाच्या ८२व्या वर्षी देखील ते कार्यरत आहेत. त्यांनी पश्चिम घाटात अनेक वर्षे संशोधन करून एक अहवाल तयार केला होता. पश्चिम घाटातील पर्यावरणाचा प्रकल्पांमुळे होणारा ऱ्हास त्यांनी या अहवालात मांडला आहे. डॉ. गाडगीळ यांनी आतापर्यंत ७ पुस्तके लिहिली असून, २२५ वैज्ञानिक संशोधनपर लेख आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

मी लोकांसमवेत काम केले!

“जे काही बरोबर आहे, त्याविरुद्ध लिखाण केल्यामुळे मी आनंदी आहे. मी एक शास्त्रज्ञ असून, लोकांसमवेत काम केले. अन्यथा इतर शास्त्रज्ञ असे काम करत नाहीत. ते राजकारणी लोकांच्या दबावाखाली वस्तुनिष्ठ व स्पष्ट असे काम करायला घाबरतात. परंतु, मी गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करतोय. त्यामुळे मी समाधानी आहे आणि हा पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला,” असे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in