डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी यांच्यासह दिग्गजांनी घेतले अंत्यदर्शन

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी निगम बोध घाटावर सकाळी ११.४५ वा. अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी यांच्यासह दिग्गजांनी घेतले अंत्यदर्शन
एक्स
Published on

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी निगम बोध घाटावर सकाळी ११.४५ वा. अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंतिम दर्शन घेतले व त्यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तसेच शोक प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

तिरंग्यात गुंडाळलेले सिंग यांचे पार्थिव शुक्रवारी ३, मोतीलाल नेहरू रोड येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी डॉ. सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.

काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी ८ वाजता सिंग यांचे पार्थिव काँग्रेसच्या मुख्यालयात ठेवले जाईल. तेथे ८.३० ते ९.३० दरम्यान लोक त्यांचे अंत्यदर्शन घेऊ शकतील. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा सकाळी ९.३० वाजता काँग्रेस मुख्यालयातून सुरू होणार आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर नवी दिल्लीतील निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी डॉ. सिंग यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.

सिंग यांच्या निधनाबाबत जगभरातून शोक

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या वृत्तानंतर जगभरातील विविध देशांच्या नेत्यांनी सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. मालदीव आणि अफगाणिस्तानसह अनेक शेजारी देशांच्या नेत्यांनी सिंग यांचे योगदान व इतर देशांशी चांगले संबंध ठेवण्याच्या कृतीची आपल्या शोकसंदेशात प्रशंसा केली. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हामिद करजाई म्हणाले की, अफगाणी जनतेचा अतूट सहयोगी व दोस्त म्हणून सिंग प्रसिद्ध होते.

सिंग यांच्या निधनाबद्दल मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद म्हणाले की, ते मालदीवचे चांगले मित्र होते. भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव म्हणाले की, सिंग यांचे निधन भारत व रशियासाठी खूप दु:खाची बाब आहे. भारत व रशियाचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांचा सौम्य स्वभाव व अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांच्या योगदानाचे कायम कौतुक होत होते. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी म्हणाले की, भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारण्यासाठी त्यांनी स्वत:चे मौलिक योगदान दिले.

डॉ. सिंग यांच्या समाधीसाठी जागा द्या - काँग्रेसची मागणी

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या समाधीसाठी जागा देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करणे आणि त्यांचे योग्य स्मारक उभारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर बोलून आणि पत्र लिहून केले आहे.

भारत-चीन संबंध सुधारण्यात महत्त्वाचे योगदान

भारत-चीनमधील संबंध विकसित करण्यात डॉ. मनमोहन सिंग यांचे महत्त्वाचे योगदान होते, अशा शब्दांत चीनने सिंग यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली. चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, डॉ. सिंग यांच्या कार्यकाळात उभय देशांनी शांतता व विकासासाठी सहकार्याची व्यापक भूमिका घेतली. भारत-चीन सीमावाद सोडवण्यासाठी राजकीय करारही झाले. त्यांच्या निधनाबद्दल चीन तीव्र शोक व्यक्त करत आहे.

भारत-चीन संबंध सुधारण्यात महत्त्वाचे योगदान

भारत-चीनमधील संबंध विकसित करण्यात डॉ. मनमोहन सिंग यांचे महत्त्वाचे योगदान होते, अशा शब्दांत चीनने सिंग यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली. चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, डॉ. सिंग यांच्या कार्यकाळात उभय देशांनी शांतता व विकासासाठी सहकार्याची व्यापक भूमिका घेतली. भारत-चीन सीमावाद सोडवण्यासाठी राजकीय करारही झाले. त्यांच्या निधनाबद्दल चीन तीव्र शोक व्यक्त करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in