DRDO गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकाला हेरगिरीप्रकरणी अटक; मोबाइल, चॅट्समधून पुरावे सापडले

जैसलमेर जिल्ह्यातील ‘डीआरडीओ’ गेस्ट हाऊसचा व्यवस्थापक महेंद्र प्रसाद याला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. महेंद्र प्रसाद २००८ पासून येथे कार्यरत आहे. या गेस्ट हाऊसमध्ये लष्करी चाचण्या आणि संशोधनाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि शास्त्रज्ञ मुक्काम करतात.
DRDO गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकाला हेरगिरीप्रकरणी अटक; मोबाइल, चॅट्समधून पुरावे सापडले
Photo : IANS
Published on

जैसलमेर : जैसलमेर जिल्ह्यातील ‘डीआरडीओ’ गेस्ट हाऊसचा व्यवस्थापक महेंद्र प्रसाद याला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. महेंद्र प्रसाद २००८ पासून येथे कार्यरत आहे. या गेस्ट हाऊसमध्ये लष्करी चाचण्या आणि संशोधनाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि शास्त्रज्ञ मुक्काम करतात.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील गुप्तचर यंत्रणा चांगलीच सक्रिय झाली आहे. त्यांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या संशयिताना ताब्यात घेण्याचा धडका लावला आहे. ज्योती मल्होत्रानंतर अनेक ठिकाणाहून पाकिस्तानी हेरांना अटक करण्यात आली. काही भारतीयांना हनी ट्रॅप प्रकरणात अडकवून हेरगिरी करण्यास भाग पाडण्यात आले. आता भारत-पाकिस्तान सीमेवर आणखी एका संशयिताला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आले आहे.

महेंद्र प्रसाद हा उत्तराखंडमधील अल्मोडा येथील रहिवासी आहे. तो भारत-पाकिस्तान सीमेवर जैसलमेर जिल्ह्यातील चांधन येथील ‘डीआरडीओ’ गेस्ट हाऊसचा मॅनेजर आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या गंभीर आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने लष्करी अधिकाऱ्यांची माहिती सीमेपलीकडे पाठवल्याचा आरोप आहे. जैसलमेरमध्ये पोखरण फायरिंग रेंजसारखी संवेदनशील ठिकाणे आहेत.

आरोपीच्या मोबाइल आणि चॅट्समधून हेरगिरीचे महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. संशय आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी बराच काळ त्याच्यावर नजर ठेवली होती. पुरावे मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले. सुरक्षा यंत्रणा आणि लष्करी गुप्तचर विभाग त्याची कसून चौकशी करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in