
नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. आतापर्यंत क्षेपणास्त्रे, विमान, ड्रोन पाडण्यासाठी रणगाडे, विमानविरोधी तोफांची गरज लागत होती. त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जात होती. आता केवळ लेझरच्या सहाय्याने विमान, क्षेपणास्त्र, ड्रोन पाडण्याची ताकद भारताने कमावली आहे. यासोबतच अशी क्षमता असलेल्या मोजक्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे.
भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) ‘एमके-२ (ए) ही लेझर ऊर्जा यंत्रणा विकसित केली आहे. याचे प्रात्यक्षिक कर्नुल येथे करण्यात आले. या यंत्रणेने लेझरचा वापर करून क्षेपणास्त्र, ड्रोन व विमान पाडता येणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याने भारत आता अमेरिका, चीन आणि रशिया या देशांच्या यादीत आला आहे. या देशांकडे हे ‘उच्च श्रेणी’चे लेझर तंत्रज्ञान आहे.
डीआरडीओचे अध्यक्ष समीर कामत म्हणाले, अमेरिका, रशिया आणि चीनकडे हे तंत्रज्ञान आहे. इस्त्रायलही हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. डीआरडीओ अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, जे ‘स्टार वॉर्स’ची क्षमता देऊ शकेल. ही केवळ सुरुवात आहे. मला विश्वास आहे की, लवकरच आमचे लक्ष्य आम्ही गाठू. आम्ही यावर अधिक संशोधन करत आहोत. आम्ही सर्व मिळून ‘स्टार वॉर्स’ सारखे तंत्रज्ञान विकसित करू, असे ते म्हणाले.
भारतात बनलेल्या ‘एमके-२(ए) या यंत्रणेने आपली क्षमता दाखवली आहे. त्याने दीर्घपल्ल्याच्या ड्रोनचा वेध घेतला. तसेच शत्रूचे टेहळणी सेन्सर व एंटीना उद्ध्वस्त केला. या लेझरने वीजेचा वेग, अचूकता व काही सेकंदात लक्ष्याला टार्गेट करण्याची क्षमता आहे. यामुळे शक्तीशाली काऊंटर ड्रोन यंत्रणा बनली आहे. या लेझर यंत्रणेमुळे महागड्या दारुगोळ्याची गरज कमी होणार आहे. तसेच नुकसानही टळणार आहे.