वर्षात ५ वेळा नियम मोडल्यास वाहन परवाना निलंबित; परिवहन मंत्रालयाचा नवीन नियम लागू

आता सिग्नल तोडणे किंवा कोणतेही वाहतुकीचे नियम तोडणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. एखाद्या वाहनचालकाने वर्षभरात पाच किंवा त्याहून अधिक वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचा वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) एक-दोन नव्हे तर तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार नाही.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : आता सिग्नल तोडणे किंवा कोणतेही वाहतुकीचे नियम तोडणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. एखाद्या वाहनचालकाने वर्षभरात पाच किंवा त्याहून अधिक वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचा वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) एक-दोन नव्हे तर तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार नाही.

रस्ते सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची तरतूद दळणवळण मंत्रालयाच्या नवीन मोटर व्हेईकल सुधारणा नियमात करण्यात आली आहे. आरटीओ किंवा जिल्हा ट्रान्सपोर्ट ऑफिस यांना वाहनचालक परवानासंबंधीचे निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या नव्या तरतुदीनुसार आरटीओ किंवा जिल्हा ट्रान्सपोर्ट ऑफिसने चालकाचा परवाना रद्द करण्यापूर्वी परवानाधारकाची बाजू ऐकून घेतली पाहिजे. या नवीन नियमाचे नोटीफिकेशन बुधवारी जारी करण्यात आले. पाच किंवा त्यापेक्षा जास्त वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर चालक परवाना रद्द करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारीपासून लागू झाली आहे.

आता नियम मोडल्यानंतर दंड भरून वाहनचालकांची सुटका होऊ शकणार नाही. त्यासाठी त्यांना आपला परवाना वाचवण्यासाठी प्रत्येक लहान किंवा मोठे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. मात्र, दंड ठोठावण्याआधी वाहनचालकाला आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल. विशेष म्हणजे, एका वर्षाच्या आतच पाचपेक्षा अधिक नियम मोडणाऱ्यांना ही शिक्षा लागू होईल. समजा, एका वर्षात चार वेळा नियम मोडले आणि दुसरे वर्ष उजाडले तर पुन्हा नव्याने नियम मोडण्याची संधी वाहनचालकांना मिळणार आहे. त्यांचे आधीचे गुन्हे माफ केले जातील.

हेल्मेट, सीटबेल्ट न घालणे भोवणार

किरकोळ चुकांमुळे अनेकदा मोठे रस्ते अपघात होतात आणि सार्वजनिक धोका निर्माण होतो. त्यामुळेच छोट्याछोट्या नियमांकडेही परिवहन मंत्रालयाने लक्ष दिले आहे. वाहन चोरी, अपहरण, प्रवाशांवर हल्ला, ओव्हरलोडिंग आणि अतिवेग यांबरोबरच आता हेल्मेट न परिधान करणे तसेच सीटबेल्ट न लावणे असे नियम मोडणेही वाहनचालकांना भोवणार आहे.

असा होईल वाहन परवाना निलंबित

नवीन नियमानुसार, वाहन चोरी, प्रवाशावर हल्ला, प्रवाशाचे अपहरण, वेगाची मर्यादा ओलांडणे, मर्यादेपेक्षा जास्त सामान गाडीत भरणे, सार्वजनिक ठिकाणी वाहन बेवारस स्थितीत सोडून जाणे अशा स्थितीत वाहन परवाना निलंबित होऊ शकतो. त्याचबरोबर हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न लावणे, सिग्नल मोडणे यांसारख्या तुलनेने कमी तीव्रतेच्या गुन्ह्यांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in