निवडणूक हंगामात खासगी विमानांची चलती; हेलिकॉप्टरचे तासाचे भाडे ३.५ लाख; तर चार्टर्ड विमानाचे भाडे ५.२५ लाख रुपये

लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी राजकीय पक्षांना मोठी यंत्रणा राबवावी लागते.
निवडणूक हंगामात खासगी विमानांची चलती; हेलिकॉप्टरचे तासाचे भाडे ३.५ लाख; तर चार्टर्ड विमानाचे भाडे ५.२५ लाख रुपये

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी राजकीय पक्षांना मोठी यंत्रणा राबवावी लागते. या निवडणुकीत दूरदूरचे अंतर कापण्यासाठी विविध पक्षांचे बडे नेते चार्टर्ड विमान व हेलिकॉप्टरचा वापर करतात. यंदाची लोकसभा निवडणूक चुरशीची ठरणार असल्याने प्रचारासाठी खासगी जेट, हेलिकॉप्टरना मोठी मागणी असणार आहे, असा अंदाज या क्षेत्रातील कंपन्यांनी व्यक्त केला आहे.

चार्टर्ड विमानापेक्षा दुर्गम व ग्रामीण भागात पोहचण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी अधिक असते. यंदा खासगी जेट व हेलिकॉप्टरची मागणी वाढली आहे, असे ‘क्लब वन एअर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन मेहरा यांनी सांगितले.निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्या एकदा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष चार्टर्ड विमाने व हेलिकॉप्टरची मागणी नोंदवायला सुरुवात करतील.

चार्टर्ड विमान व हेलिकॉप्टरच्या मागणीत ३० ते ४० टक्के वाढ अपेक्षित

चार्टर्ड विमानाचे भाडे प्रति तास ४.५ लाख ते ५.२५ लाख रुपये तर हेलिकॉप्टरचे तासाचे भाडे १.५ लाख रुपये असते. व्यावसायिक विमान कंपन्यांच्या असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन आर. के. बाली म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या काळात चार्टर्ड विमान व हेलिकॉप्टरच्या मागणीत ३० ते ४० टक्के वाढ होईल. देशातील विमान कंपन्यांकडे विमान व हेलिकॉप्टरचा मोठा ताफा आहे. यात फाल्कन-२०००, बॉम्बिर्डियर ग्लोबल ५०००, ट्‌विन ओट्टर डीएचसी-६-३००, हॉकर बीचक्राफ्ट, गल्फस्ट्रीम जी-२००, सेस्ना सायटेशन ५६० एक्सएल आदी विमानांचा समावेश आहे. यातील बहुतेक विमान कंपन्यांची आसन क्षमता १० पेक्षा कमी आहे.

हेलिकॉप्टरचे भाडे ३.५ लाख आणि चार्टर्ड विमानाचे भाडे ५.२५ लाखांवर

गेल्या दोन दशकांचा चार्टर्ड विमान व्यवसायाचा अनुभव असलेल्या एका एक्झिक्युटिव्हने सांगितले की, यंदा विमान व हेलिकॉप्टरची मागणी खूप असणार आहे. तर काही कंपन्या आपले विमान व हेलिकॉप्टर आपल्या ग्राहकाला करार पद्धतीवर देणार आहेत. यंदा हेलिकॉप्टरचे भाडे १.५ लाख प्रति तासावरून ते ३.५ लाख रुपये जाऊ शकते. तर चार्टर्ड विमानाचे भाडे तासाला ४.५ लाख ते ५.२५ लाख प्रति तास असू शकते, असे ते म्हणाले. २०१९-२० च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विमान व हेलिकॉप्टरवर २५० कोटी तर काँग्रेसने १२६ कोटी रुपये खर्च केले होते. पक्षाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या तपशीलातून ही माहिती उघड झाली.

निवडणुकीचा खर्च १.२० लाख कोटी

ज्येष्ठ निवडणूक विश्लेषक एन. भास्कर राव म्हणाले की, येत्या लोकसभा निवडणुकीचा एकत्रित खर्च १.२० लाख कोटी असण्याची शक्यता आहे. त्यात भारताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाला अंदाजे वीस टक्के खर्च येईल.

logo
marathi.freepressjournal.in