दिल्लीत बॉम्बस्फोटांच्या धमकीचे ई-मेल

दिल्लीतील आठ रुग्णालयांसह इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला (आयजीआय) बॉम्बस्फोटांची धमकी देणारे ई-मेल आल्याचे रविवारी अग्निशमन दलाच्यावतीने सांगण्यात आले.
दिल्लीत बॉम्बस्फोटांच्या धमकीचे ई-मेल

नवी दिल्ली : दिल्लीतील आठ रुग्णालयांसह इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला (आयजीआय) बॉम्बस्फोटांची धमकी देणारे ई-मेल आल्याचे रविवारी अग्निशमन दलाच्यावतीने सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी दिल्ली आणि एनसीआर परिसरातील शाळांना अशा प्रकारचे धमकीचे ई-मेल आले होते. या घटनेची माहिती मिळताच तातडीने परिसर पिंजून काढण्यात आला, मात्र ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, शहराच्या उत्तरेकडील बुरारी रुग्णालय आणि बाह्य दिल्लीतील संजय गांधी रुग्णालयांना धमकीचे ई-मेल पाठवण्यात आले आहेत. सायंकाळी ६ वाजता धमकीचा ई-मेल आल्याचे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले.

या ई-मेलचा तपास केला असता ते रशियातून पाठिवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. धमकीचे ई-मेल आल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, बॉम्ब निकामी करणारे पथक, श्वानपथक तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. ही पथके रुग्णालय आणि विमानतळाचा परिसर पिंजून काढत असून आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळलेले नाही. मेलबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in