आधी एलपीजी दरवाढ आता नवे कनेक्शनही महागले, ७५० रुपयांचा जादा भुर्दंड

भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने दिलेल्या माहितीनुसार, ५ किलोच्या सिलिंडरची सुरक्षा रक्कम आता ८०० रुपयांऐवजी ११५० रुपये करण्यात आली आहे
आधी एलपीजी दरवाढ आता नवे कनेक्शनही महागले, ७५० रुपयांचा जादा भुर्दंड
ANI

पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी १४५० रुपये मोजावे लागत होते. पण आता यासाठी तुम्हाला ७५० रुपये अधिक म्हणजेच २२०० रुपये द्यावे लागतील.

पेट्रोलियम कंपन्यांनी १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या कनेक्शनमध्ये प्रति सिलिंडर ७५० रुपयांनी वाढ केली आहे. जर तुम्ही दोन सिलिंडर कनेक्शन घेतले तर तुम्हाला १५०० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. म्हणजेच, यासाठी तुम्हाला ४४०० रुपये सिक्युरिटी म्हणून भरावे लागतील. यापूर्वी यासाठी २९०० रुपये मोजावे लागत होते. कंपन्यांनी केलेला हा बदल १६ जूनपासून लागू होणार आहे. त्याचप्रमाणे रेग्युलेटरसाठी १५० रुपयांऐवजी २५० रुपये खर्च करावे लागतील.

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने दिलेल्या माहितीनुसार, ५ किलोच्या सिलिंडरची सुरक्षा रक्कम आता ८०० रुपयांऐवजी ११५० रुपये करण्यात आली आहे.

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनाही या नव्या दरांच्या अंमलबजावणीमुळे धक्का बसणार आहे. उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनी त्यांच्या कनेक्शनवर सिलिंडर दुप्पट केल्यास त्यांना दुसऱ्या सिलिंडरसाठी वाढीव सुरक्षा रक्कम जमा करावी लागेल. दरम्यान, नवीन गॅस कनेक्शनसह येणाऱ्या पासबुकसाठी ग्राहकांना २५ रुपये आणि पाईपसाठी १५० रुपये मोजावे लागतील. नवीन कनेक्शनच्या किंमतीत सहसा अशा सर्व खर्चाचा समावेश असतो. मात्र, गॅस सिलिंडरसह स्टोव्ह घेण्यासाठी ग्राहकांना आता जादा पैसे मोजावे लागत आहेत.

ग्राहकांना हा नवा भुर्दंड

विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत – रु. १०६५

सिलिंडरसाठी सुरक्षा रक्कम – रु. २२००

रेग्युलेटरसाठी सुरक्षा रक्कम – रु. २५०

पासबुकसाठी २५ रुपये

पाईपसाठी १५० रुपये

आता तुम्ही एका सिलिंडरसह नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी गेलात, तर त्यासाठी तुम्हाला एकूण ३६९० रुपये मोजावे लागतील. स्टोव्ह घ्यायचा असेल तर त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील. अशाप्रकारे, एलपीजीच्या वाढत्या किमतींनंतर आता कनेक्शनच्या वाढत्या किमतीमुळे लोक पार मेटाकुटीला आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in