पुणे : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग तसेच निकोबार बेटावर १३ मे दरम्यान दाखल होण्याची दाट शक्यता हवामान विभागाने मंगळवारी वर्तविली. सर्वसाधारणपणे १८ मेच्या आसपास मान्सून अंदमान, निकोबार बेटांवर दाखल होतो. यंदा तो लवकर दाखल होण्याची शक्यता असल्याने केरळमध्येदेखील मान्सूनचे आगमन लवकर होण्याची शक्यता आहे. यामुळे उष्णतेने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, तीव्र उष्णतेच्या लाटेनंतर सध्या देशाच्या अनेक भागात वादळी पावसाचा अंदाज आहे. ८ मेनंतर देशाच्या पूर्व भागात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात अवकाळी पाऊस सुरू असून, तो काही दिवस कायम राहील. पूर्व विदर्भ ते दक्षिण तमिळनाडूदरम्यान उत्तर-दक्षिण द्रोणीय रेषा मंगळवारी दक्षिणेकडे सरकलेली आहे. याच्या प्रभावामुळे राज्यात पाऊस पडणार आहे.
पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानंतरच्या दिवसात पुन्हा २ ते ३ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होईल. विदर्भात पुढील ७२ तासांत कमाल तापमानात कोणताही बदल होणार नाही. परंतु, त्यानंतर त्यात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे.